मुंबई : परभणी लाचखोर पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रामकरण पाल याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा (एसीबी) ससेमिरा लागला आहे. त्याच्या मुंबईतील फ्लॅटची झडती घेण्यात आली असून त्यातून २४लाख ८४ हजाराची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे. त्याचे व कुटुंबातील सदस्यांचे बँक व्यवहार व अन्य मालमत्तेची कागदपत्रे ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले.
दीड कोटी रुपयांची लाचेतील १० लाखाचा पहिला हप्ता घेताना राजेंद्र पाल व त्याचा ऑर्डली कॉन्स्टेबल गणेश लक्ष्मणराव चव्हाण यांना एसीबीने शुक्रवारी परभणीतील सेलू विभागाचे उपअधीक्षक कार्यालयात अटक केली आहे. त्याची अनेक वर्षे मुंबईत सेवा झाली असून पदोन्नतीवर परभणीला बदली होण्यापूर्वी तो वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक होता.
राजेंद्र पाल याचे कुटुंबीय मुंबईत राहत असून एसीबीच्या पथकाने आज सकाळपासून त्याच्या पश्चिम उपनगरातील फ्लॅटची झाडाझडती घेतली. त्यावेळी बेहिशेबी २४.८४ लाख रुपये मिळाले. त्याचबरोबर बँकेची पासबुक व अन्य मालमत्तेचे दस्तावेजही ताब्यात घेतले आहेत. त्याच्या स्थावर व जंगम मालमत्तेचे सविस्तर चौकशी केली जाणार आहे.