ठाणे : कुख्यात गुंड सुरेश पुजारी याला फिलीपाईन्स येथील स्थानिक पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्या प्रत्यार्पणासाठी सरकारने तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे पुजारी याच्या विरोधात ठाणे पोलीस आयुक्तालयात २५ विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खंडणी, खुनाचा प्रयत्न, धमकावणे , संघटीत गुन्हेगारी अशा स्वरुपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. परंतु आता त्याचा ताबा मिळविण्यासाठी ठाणे पोलीस केंद्राच्या गृहमंत्र्यालयाकडे पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
फिलिपाईन्स देशातील परानाक्यू शहरात सुरेश पुजारी याला तेथील स्थानिक पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. भारतीय यंत्नणा त्याला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्नात सुरेश पुजारी याच्याविरोधात उल्हासनगर येथे पाच, बदलापूर येथे दोन, अंबरनाथ दोन, मध्यवर्ती दोन, शिवाजीनगर दोन, खडकपाडा दोन, डोंबिवली दोन, महात्मा फुले दोन, कोळसेवाडी एक, विठ्ठलवाडी एक, श्रीनगर एक, हिललाईन एक, विष्णुनगर एक आणि कोनगावमध्ये एक असे तब्बल २५ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
या गुन्ह्यात खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणो, धमकावणो, संघटीत गुन्हेगारी अशा स्वरुपाच्या गुन्ह्यांचा त्यात समावेश असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली. दुसरीकडे आता त्याचा ताबा घेण्यासाठी ठाणे पोलिसांनी तयारी सुरु केली आहे. त्यानुसार केंद्रीय गृहमंत्रलयाकडे पत्रव्यवहार केला जाणार असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली.