-मधुकर ठाकूर उरण : जेएनपीटी बंदरातील १२५ कोटींच्या २४.४५ किलो हेरॉइनप्रकरणी डीआरआयने इराणमध्ये राहणाऱ्या एका भारतीय वंशाच्या व्यक्तीसह काल दिल्लीहून आणखी दोन व्यक्तींना अटक केली आहे. त्यांना आज चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आल्याची माहिती डीआरआयने दिली आहे.
“मुंबईच्या मस्जिद बंदराचा पत्ता असलेल्या एका आयातदाराच्या नावाने कंधारमधून कंटेनर आयात करण्यात आले होते. ते इराणमधील चाबहार बंदरातून आले होते. सीमाशुल्क दस्तऐवजात तीळ, बियाणे आणि मोहरीचे तेल म्हणून माल घोषित करण्यात आला होता. इराणहून आलेल्या कंटेनरला ५ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेऊन संशयित कंटेनरची काळजीपूर्वक तपासणी करताना तपास अधिकाऱ्यांना मोहरीच्या तेलाच्या पाच डब्यांमधील सामग्री वेगळी असल्याचे निदर्शनास आले. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी पाच संशयास्पद डब्यांची आणखी कसून तपासणी केली असता त्या डब्याच्या तळाशी पांढऱ्या रंगाची सामग्री लपवलेली आढळली. एनडीपीएस फिल्ड किटसह चाचणी केल्यावर त्यामध्ये २४.४५ किलो हेरॉइन आढळून आले.
याप्रकरणी इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तीलाही डीआरआयने अटक केली आहे. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत तस्करीमार्गाने आणण्यात आलेला जप्त करण्यात आलेला हेरॉइनचा साठा त्यानेच आयात केल्याची कबुली दिली असल्याची माहिती डीआरआयने दिली आहे. डीआरआयने सांगितले की, शोधमोहिमेदरम्यान, काल दिल्लीहून आणखी दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले असल्याची माहिती डीआरआय तपास अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींना सत्र न्यायालयाने डीआरआय कस्टडीमध्ये पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास डीआरआयकडून सुरू आहे.