गाझियाबाद
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये पेट्रोल पंप कामगारांकडून मोठी लूट झाल्याची घटना समोर आली आहे. हल्लेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून पेट्रोल पंपच्या कर्मचार्यांकडून २५ लाख रुपये लुटले. ही रक्कम पेट्रोल पंपाचे कर्मचारी बँकेत जमा करणार होते, असं सांगण्यात येत आहे. त्यानंतर तीन चोरट्यांनी त्यांच्याकडून ही रक्कम लुटली.
दरोड्याची घटना मसुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोविंदपुरमची आहे. डासना परिसरात असलेल्या पेट्रोल पंपचे चार कर्मचारी तीन दिवसांपासून पेट्रोल पंपावर जमा केलेली रोकड गोविंदपुरम येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेत जमा करण्यासाठी दोन दुचाकी घेऊन जात होते. यादरम्यान, वाटेत दोन मोटारसायकलवर तीन चोर आले आणि त्यांनी रोख रक्कम जमा करण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दुचाकीसमोर त्यांच्या दुचाकी उभ्या केल्या. कर्मचाऱ्यांना काही समजण्यापूर्वीच हल्लेखोरांनी पिस्तुल काढून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांकडून बॅग हिसकावण्याचा प्रयत्न सुरू केला. कर्मचाऱ्यांनी बॅग न सोडल्यामुळे हातावर गोळी झाडण्याची धमकी दिली, त्यानंतर बाचाबाचीत कर्मचाऱ्यांच्या हातात बॅगचा फक्त पट्टा राहिला आणि चोरट्यांनी रोख रकमेसह बॅग पळवून नेली.
दरम्यान पोलिसांनी घटनास्थळ गाठून तीन राऊंड गोळीबार केला मात्र हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. चोरट्यांनी ही खळबळजनक घटना दिवसाढवळ्या बेधडकपणे केली आहे. एवढ्या मोठ्या दरोड्याची माहिती मिळताच पोलिस विभागात खळबळ उडाली असून गाझियाबाद पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती घेतली. चोरट्यांची ओळख पटवून त्यांना लवकरच अटक केली जाईल असा दावा पोलिसांनी केला आहे. समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेख यादव यांनीही याच घटनेचे फोटो ट्विट करत योगी सरकारवर निशाणा साधला आहे. "भाजपच्या राजवटीत सरकार पेट्रोलमधूनही जनतेची लूट करत आहे आणि यूपीच्या पेट्रोल पंपावर हे गुन्हेगारही लूट करत आहेत", असा टोला अखिलेश यादव यांनी लगावला आहे.
दरोड्याचे काही फोटोही समोर आले आहेत, यामध्ये हल्लेखोर हातात पिस्तुल घेऊन स्पष्टपणे दिसत आहेत. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्यांनी हे फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत. गुन्हेगारांनी तोंड लपवण्यासाठी हेल्मेट घातलं होतं. गाझियाबादमध्ये चोरीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. काही दिवसांपू्र्वी आरडीसी परिसरात चोरट्यांनी गोल्ड फायनान्सिंग कंपनीत घुसून 10 लाखांहून अधिकचा ऐवज लुटून घटनास्थळावरून पलायन केलं होतं.