मुंबई - मुंबई या स्वप्ननगरीत आपलं हक्काचं घर व्हावं हे सर्वांचं स्वप्न असतं. मात्र, अनेकदा लोक घर घेण्याच्या नादात लाखो रुपयांना फसतात. म्हाडामध्ये स्वस्तात घर मिळवून देतो असं सांगून अनेकांची फसवणूक झाल्याचा प्रकार आतापर्यंत अनेकदा उघडकीस आलेला आहे. आता मात्र चक्क पोलीस दलातील निलंबित पोलीस कॉन्स्टेबलने माजी गृहनिर्माण राज्यमंत्री यांच्या नावाचा गैरवापर करुन म्हाडामध्ये स्वस्तात घर मिळवून देतो म्हणून २५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
याप्रकरणी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी जगन्नाथ भिकाजी कदम हे फोर्टला राहतात. छोटं घर आणि मोठं कुटुंब असल्याकारणाने त्यांनी आरोपीला वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून पैसे दिले होते. मात्र, त्यांना पैसे आणि घर या दोन्ही गोष्टी न मिळाल्याने त्यांनी पोलिसात धाव घेतली. सध्या आरोपी गायकवाड याचा पोलीस शोध घेत आहेत. यापूर्वीही आरोपी गायकवाडवर अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.
मुंबई पोलीस दलात काम करणारा नितीन गायकवाड याने २०११ ते २०१२ दरम्यान माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्याशी चांगली ओळख असून मला २५ लाख द्या, मी तुम्हाला म्हाडाचे स्वस्तात आणि मोठं घर मिळवून देतो, असे आमिष दाखवून एकाकडून २५ लाख उकळले. या सगळ्या प्रकारानंतर घरही नाही मिळालं आणि पैसेही नाही मिळाले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे समजताच पीडित व्यक्तीने पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि गायकवाडविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
आरोपी नितीन गायकवाड हा यापूर्वी माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर त्यांचा अंगरक्षक म्हणून काम करत होता. याचा फायदा घेत म्हाडाचे घर स्वस्तात रहाण्यासाठी देतो आणि त्यानंतर तुमच्या नावावर करुन देतो. त्यासाठी २५ लाख रुपये द्यावे लागतील, अशी बतावणी करून त्याने एका फिर्यादीकडून २५ लाख उकळले होते. याप्रकरणी एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. याआधी देखील आरोपी नितीन गायकवाड याच्यावर अशाच प्रकारचे अनेक गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर मुंबई पोलीस दलातून त्याला निलंबित करण्यात आले आहे.