लखनौ : कानपूर चकमकीत ८ पोलिसांची हत्या झाल्यानंतर संशयाच्या फेऱ्यात अडकलेले चौबेपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख विनय तिवारी यांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, गुंड विकास दुबेला पकडण्यासाठी पोलिसांच्या २५ टीम तयार करण्यात आल्या आहेत.कानपूरचे पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, तिवारी यांच्यावरील आरोपांची चौकशी केली जात आहे. जर त्यांचा किंवा कोणत्याही पोलिसाचा या घटनेशी संबंध आढळून आला, तर त्याला केवळ बरखास्तच केले जाणार नाही, तर तुरुंगात पाठविले जाईल.पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, काही पोलिसांचीही चौकशी केली जात आहे. याचा शोध घेतला जात आहे की, पोलीस त्याच्या घरी धाड टाकणार याची त्याला माहिती कशी मिळाली. त्यामुळे त्याने पूर्ण तयारीनिशी पोलीस दलावर हल्ला केला.पोलिसांनी विकास दुबेचे घर का पाडले? याबाबत विचारणा केली असता अग्रवाल म्हणाले की, गावातील लोकांचे म्हणणे आहे की, दुबेने गुंडागर्दी करून लोकांच्या जमिनीवर कब्जा केला होता. लोकांकडून वसुली करून हे घर बनविले होते.अग्रवाल यांनी सांगितले की, विकासला पकडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टीम राज्याच्या विविध भागांत आणि अन्य राज्यांतही धाडी टाकत आहेत. जवळपास ५०० मोबाईल फोनची तपासणी केली जात असून, त्या माध्यमातून विकासबद्दल काही माहिती मिळते का, ते शोधले जात आहे.विकासबाबत माहिती देणाºयास आयजींनी ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. दरम्यान, चकमकीत जखमी झालेल्या ७ पोलिसांवर कानपूरच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. लखनौ पोलिसांनी विकास दुबे याच्या कृष्णानगरस्थित घरावर छापा मारला. मात्र, तो तिथे सापडला नाही....तर विकासचेही एन्काऊंटर करा : आई सरलालखनौ : विकास दुबे याच्या गुंडांच्या टोळीने ८ पोलिसांना गोळ्या घालून ठार मारल्यानंतर त्याच्या आईने सरला देवी यांनी असे मत व्यक्त केले आहे की, विकासलाही एन्काऊंटरमध्ये ठार मारायला हवे. सरला देवी या त्यांचा दुसरा मुलगा दीपप्रकाश दुबे याच्यासोबत कृष्णानगरमध्ये राहतात.पत्रकारांशी बोलताना सरला देवी यांनी पोलिसांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त केले. जर आपल्या मुलाचे एन्काऊंटर केले, तर आपल्याला वाईट वाटणार नाही, असेही त्या म्हणाल्या. विकास सध्या कुठे असेल याबाबत आपल्याला काहीच माहीत नसल्याचेही त्या म्हणाल्या. कृष्णानगरमधील निवासस्थानी त्यांच्यासोबत सून अंजली, नातू गुनगुन आणि राम हेही राहतात. विकासचे वडील हे कानपूरच्या बिकरू गावात राहतात. त्यांना पॅरॅलिसिस झालेला आहे. विकासला दोन मुले असून, आकाश आणि शंतनू हे त्यांच्या आईसोबत सोनमसोबत गावात राहतात.
विकास दुबेला पकडण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांच्या २५ टीम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 3:52 AM