चोपडा (जि. जळगाव) : साखरपुड्याच्या कार्यक्रमात जवळपास २६ तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरट्यांनी हातोहात लांबवली. याची किंमत जवळपास १२ लाख रुपये आहे. ही घटना सोमवारी दुपारी चोपड्यानजीक अकुलखेडा येथील एका मंगल कार्यालयात घडली. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेत कसून चौकशी सुरू केली आहे.
चुंचाळे, ता. चोपडा येथील देवेंद्र नारायण चौधरी (५३) यांच्या मुलीचा सौभाग्य लॉन्स येथे सोमवारी सकाळी साखरपुडा होता. त्यांनी आपल्याकडील दागिने एका बॅगमध्ये ठेवले होते. यात जवळपास २६ तोळे सोने होते. दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास चौधरी दागिने घेण्यासाठी गेले असता बॅग जागेवर नव्हती. चोरी झाल्याचे कळताच सर्वांनाच धक्का बसला.
बॅगेमध्ये दोन लाख रुपये किमतीचे सात तोळ्याचे नेकलेस, चार लाख ५० हजार रुपये किमतीचा नऊ तोळे सोन्याचा नेकलेस, चार लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या नऊ तोळे वजनाच्या सहा बांगड्या यासह अनेक वस्तू होत्या. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी कृषिकेश रावळे, पोलिस निरीक्षक चोपडा शहर के. के. पाटील, सहायक पोलिस निरीक्षक अजित साबळे, सहायक पोलिस निरीक्षक संतोष चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी फोटोग्राफर व इतर संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली आहे. याबाबत चोपडा शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.