संयुक्त राष्ट्र : अमेरिका व भारताने लष्कर ए तोयबाचा दहशतवादी साजिद मीर याला काळ्या यादीत टाकण्याचा संयुक्त राष्ट्रांत मांडलेला प्रस्ताव चीनने रोखला. भारत आणि अमेरिकेच्या दहशतवादविरोधी मोहिमेत चीनने अडथळा आणण्याची चार महिन्यांतील ही तिसरी वेळ आहे. मीर हा २००८च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार असून, भारताला सर्वाधिक हव्या असलेल्या दहशतवाद्यांत त्याचा समावेश होताे.
पाकिस्तानी लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेने २६/११चा मुंबई हल्ला घडवून आणला. या हल्ल्याचा मीर हा प्रमुख सूत्रधार असल्याने अमेरिकेने त्याच्यावर ५० लाख डॉलरचे बक्षीस ठेवलेले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या समिती अंतर्गत मीरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करून काळ्या यादीत टाकावे, असा प्रस्ताव अमेरिकेने मांडला होता. भारताचा पाठिंबा असलेला हा प्रस्ताव चीनने गुरुवारी रोखल्याचे समजते . या प्रस्तावांतर्गत मीरची मालमत्ता जप्त करण्यात आली असती व तसेच त्याच्या प्रवासावर निर्बंध घालण्यात आले असते.
पाकिस्तान पॅरिसस्थित फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सच्या राखाडी यादीतून बाहेर पडण्यासाठी धडपडत आहे. त्यामुळेच पाकमधील कोर्टाने गेल्या जूनमध्ये दहशतवादास वित्त पुरवठाप्रकरणी मीरला १५ वर्षांचा तुरुंगवास ठोठावला. पाकने मीरचा मृत्यू झाल्याचा दावा मागे केला होता. पण पाश्चात्य देशांनी हा दावा फेटाळत पुरावे मागितले होते. मीर हा २००१पासून पाकिस्तानातील लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा ज्येष्ठ सदस्य असून, २६/११च्या हल्ल्यातील सहभागाबद्दल तो भारताला हवा आहे.
आडकाठी करण्याचा तिसऱ्यांदा प्रयत्न पाकमधील जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याचा भाऊ अब्दुल रऊफ अझहर याला काळ्या यादीत टाकण्याचा भारत आणि अमेरिकेचा युएनमधील प्रस्ताव चीनने गेल्या महिन्यात रोखला. चीन हा पाकिस्तानचा मित्र असल्याने निर्बंध समिती अंतर्गत दहशतवाद्यांना काळ्या यादीत टाकण्याचे प्रस्ताव वारंवार रोखत आहे. गेल्या जूनमध्येही चीनने शेवटच्या क्षणी दहशतवादी अब्दुल रेहमान मक्कीला काळ्या यादीत टाकण्याचा संयुक्त प्रस्ताव रोखला होता. मक्की हा लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफीज सईदचा मेहुणा आहे.