नवी दिल्ली : दिल्लीत 26 जानेवारीला शेतकरी आंदोलनात उसळलेल्या हिंसाचार प्रकरणी आणखी एका आरोपीला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचार आणि लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकविल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मंगळवारी रात्री पंजाबमधील होशियारपूरमधून इक्बाल सिंग याला अटक केली आहे. दिल्ली पोलिसांनी इक्बाल सिंग याच्यावर 50,000 रुपयांचे बक्षीस ठेवले होते. (26th january delhi violence case iqbal singh arrested by special cell from hoshiarpur in punjab)
नवीन कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी 26 जानेवारीला म्हणजेच प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांची विराट ट्रॅक्टर रॅली दिल्ली काढण्यात आली होती. यासाठी दिल्ली पोलिसांनी ठिकठिकाणी कडेकोड बंदोबस्त लावून सुद्धा शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन लालकिल्ल्यावर धडकले होते. यावेळी जमावाकडून पोलिसांवर हल्ला करण्यात आला होता. तसेच लाल किल्ल्यात घुसून आंदोलकांनी किल्ल्याच्या घुमटावर झेंडा फडकावला होता. या हिंसाचारप्रकरणी पोलिसांकडून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.
दरम्यान, याआधी या हिंसाचारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी बुरारी येथे आणखी पाच लोकांना अटक केली आहे. सुरजीत उर्फ दिपू (वय 26), सतवीर सिंग उर्फ सचिन (32), संदीप सिंग (35) देवेंद्र सिंग (35) आणि रवी कुमार (वय 24) यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यातील तीन जण नेहरू विहार आणि दोन रोहिणीचे आहेत. याचबरोबर, लाल किल्ल्यावर हिंसाचार भडकवणारा अभिनेता दीप सिद्धूला काल दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.
सुखविंदर सिंगला अटकयाप्रकरणी सुखविंदर सिंग याला सुद्धा अटक करण्यात आली आहे. हा आधीपासून आंदोलनात सहभागी होता. तो लाल किल्ल्याच्या लाहौरी गेटवर दिसला होता. 2 फेब्रुवारी रोजी गाझीपूर बॉर्डरवर त्याने राकेश टिकैत यांची भेटही घेतली होती. तसेच, 6 फेब्रुवारी रोजी चक्का जाम आंदोलनातही सहभागी झाला होता. त्याला चंदीगड येथून अटक करण्यात आली आहे.
लक्खा सिधाना शोध सुरुया प्रकरणातील दुसरा आरोपी लक्खा सिधाना याचाही पोलीस शोध घेत आहे. लक्खा सिधाना सातत्याने लोकेशन बदलत आहे. लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणाऱ्या जुगराजची लोकेशन कुंडली येथे दाखवली जात आहे. तो पाच दिवसांपूर्वीच पंजाबमध्ये लपला असल्याचे पुरावे मिळाले होते. मात्र आता त्याचे शेवटचे लोकेशन सिंघु बॉर्डर दाखवले जात आहे. लक्खा याला पकडण्यासाठी स्पेशल सेल आणि क्राइम ब्रांचच्या अनेक टीम टेक्निकल सर्व्हिलॉन्सची मदत घेत आहेत.