नवी दिल्ली : सीबीआयने देशातील आतापर्यंतच्या सर्वांत माेठ्या २२ हजार ८४२ काेटींच्या रुपयांच्या बँकिंग घाेटाळ्याप्रकरणी गुन्हे दाखल केले. गुजरातमधील एबीजी शिपयार्ड आणि कंपनीचे तत्कालीन सीएमडी ऋषी अग्रवाल यांच्यासह आठजणांविराेधात सीबीआयने फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. कंपनीने २८ बँकांची फसवणूक केली असून, फरार उद्याेगपती विजय मल्या व हिरे व्यावसायिक नीरव माेदी यांनी केलेल्या फसवणुकीपेक्षाही हा घाेटाळा माेठा आहे.
एबीजी शिपयार्डची सूरत व दहेज येथे शिपयार्ड आहेत. कंपनीविराेधात स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्वप्रथम तक्रार दाखल केली. कंपनीने घेतलेल्या कर्जापैकी माेठी रक्कम परदेशात पाठविली. त्यातून मालमत्ता खरेदी केली. नियम धाब्यावर बसवून पैसा दुसऱ्या कंपनीला दिला. फाॅरेंन्सिक ऑडिटनंतर २०१२ ते २०१७ या काळात ही फसवणूक केल्याचे आढळले आहे. एबीजी शिपयार्ड व एबीजी इंटरनॅशनल या दाेन प्रमुख कंपन्यांसह इतरही कंपन्यांवर आराेप केले आले आहेत. एसबीआयने ८ नाेव्हेंबर २०१९ राेजी सीबीआयकडे तक्रार दाखल केली. सीबीआयने दीड वर्ष तपास करून ७ फेब्रुवारी २०२२ राेजी गुन्हे दाखल केले. अग्रवालसह कंपनीचे तत्कालीन कार्यकारी संचालक ससंथानम मुथास्वामींसह ८ जण व एबीजी इंटरनॅशनल या कंपनीविराेधात गुन्हे दाखल केले.
या बॅंकांना फटका -एसबीआयची २ हजार ४६८, आयसीआयसीआय बँकेची ७ हजार ८९, आयडीबीआय बँकेची ३ हजार ६३४, बँक ऑफ बडाेदाची १ हजार ६१४, पंजाब नॅशनल बँकेची १ हजार २४४ आणि इंडियन ओव्हरसीज बँकेची १ हजार २२८ काेटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.