मुंबई - महानगरातील सुरक्षिततेच्या दृष्टिने शहर व उपनगरात कार्यान्वित केलेल्या सीसीटीव्ही प्रकल्पातर्गंत नवव्या तिमाहीचा २८ कोटी १३ लाख ७०५१ रुपयाचा हप्ता देण्यासाठी गृह विभागाने हिरवा कंदील दाखविला आहे. मे.लार्सन अॅड टुब्रो कंपनी लिमिटेडकडून गेल्या पाच वर्षापासून या प्रकल्पाचे काम सुरु असून त्यांना २० समान हप्तामध्ये निधी देण्यात येणार आहे.
२६/११च्या हल्यानंतर राज्यातील नागरिकांची सुरक्षा व पोलिसांच्या सक्षमीकरणातर्गंत अद्यावत साधनसामग्रींची खरेदी करण्यात येत आहे. त्याअतर्गंत मुंबईसह सर्व महानगरात टप्याटप्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. मुंबईत हा प्रकल्प राबविण्यासाठी मे.लार्सन अॅन्ड टुब्रो या कंपनीबरोबर राज्य सरकारने ७ फेब्रुवारी २०१५ रोजी करार केला. सुरवातीला त्याची किंमत एकुण ९४९ कोटी इतकी निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर दोनवेळा केलेल्या सुधारेनंतर एकुण १३०३ .५६ कोटीपर्यत खर्च वाढविण्यात आला आहे. या खर्चामध्ये एकुण ४६९७ कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पहिल्या टप्यात ९३७ व उर्वरित दोन टप्यामध्ये प्रत्येकी १८८० कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत. त्यासाठीची निश्चित केलेली रक्कम दर ३ महिन्याच्या फरकाने २० हप्तामध्ये द्यावयाची आहे. त्यानुसार आतापर्यत आठ हप्ते देण्यात आलेले असून नवव्या तिमाहीतील २८ कोटी १३ लाख ७०५१ रुपये निधी देण्याबाबतचा प्रस्ताव कंपनीचे प्रकल्प संचालकांनी गेल्या १६ ऑक्टोबरला सादर करण्यात आला होता. त्याच्या खर्चाला वित्त विभागाने मंजूरी दिल्यानंतर गृह विभागाने मुंबई पोलिसांना संबंधित कंपनीला निधी देण्यासाठी हिरवा कंदील दाखविला आहे.