भोपाळ : तीन मुलांनी त्यांच्या १२ वर्षांच्या मित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील एका खेड्यात घडला. विशेष म्हणजे या अल्पवयीन आरोपींचे वय १६, १४ आणि ११ असून, त्यांनी हे कृत्य स्थानिक ‘क्राइम शो’च्या प्रभावाखाली येऊन केले. आपल्या मोठ्या बहिणीचे आरोपींपैकी एकाशी कथित प्रेमसंबंधांना विरोध केल्याने ही हत्या झाल्याचेही सांगण्यात आले.पोलिसांनी सांगितले की, तिघांनी सायकलच्या साखळीने मुलाचा गळा दाबून खून केला आणि नंतर दगडाने त्याचे डोके फोडले आणि रविवारी धारदार चाकूने त्याचा गळा चिरला. आरोपींमध्ये दोन भावांचा समावेश आहे.
‘ब्रेकअप’ची भीती...- १६ वर्षांचा आरोपी ‘रोमँटिक शो’ पाहत मोठा झाला. ज्याचा शेवट ब्रेकअपमध्ये होत असे. त्यामुळे त्याला आपले प्रेम गमावण्याची अर्थात ब्रेकअपची भीती वाटत असल्याचे त्याने चौकशीदरम्यान सांगितलेे. - या मुलांना ब्रेकअप म्हणजे काय, हेही पुरेसे माहीत नसल्याचे पोलिसांना आढळले. ही मुले स्थानिक गुन्हेगारी कार्यक्रमांच्या प्रभावाखाली होती. त्यातूनच ब्रेकअप टाळण्यासाठी त्यांनी मुलाचा खून करण्याची योजना आखली. - स्थानिक पोलिसांनी गुन्हेगारी कटाची शिक्षा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, तीन मुलांना ताब्यात घेऊन सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
बहिणीचा विनयभंग अन्...मृत मुलाच्या वडिलांनी सांगितले की, ‘माझ्या मोठ्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या तीन मुलांवर माझ्या मुलाने आक्षेप घेतला होता. त्यांनी असे पुन्हा केले तर त्यांच्या पालकांना सांगेल, असा दम त्याने दिला होता.’ मृत मुलाच्या वडिलांची नुकतीच नोकरी गेली होती आणि गेल्या दोन महिन्यांपासून ते पत्नी, १४ वर्षांची मोठी मुलगी आणि मुलासह राहत होते.
दुपारी घरातून गेला, तो परतलाच नाही...‘रविवारी दुपारी मुलगा १ वाजता घरातून निघून गेला. आम्हाला वाटले की, तो गावात खेळण्यासाठी गेला आहे. संध्याकाळी पाचच्या सुमारास, त्यांच्या शेजाऱ्याने त्या मुलाच्या पालकांना घराजवळील खड्यांच्या ढिगाऱ्यावर टाकलेल्या पॉलिथिनची पिशवी दाखवली. त्यात त्याचा मृतदेह आढळला. त्याच्या गळ्यात नायलॉनच्या दोरीसह सायकलची साखळी बांधलेली होती. त्याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते आणि नाकावर, कपाळावर मारहाणीच्या खुणा होत्या,’ असे मुलाच्या वडिलांनी पोलिस तक्रारीत म्हटले आहे.