-मंगेश कराळे
नालासोपारा : मुंबईच्या ४६ वर्षीय कंपनी मालकाचे अपहरण करून ४ करोड रुपयांची खंडणी मागणाऱ्या तीन सख्या भावांना अटक करण्यात पेल्हार पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपींकडून रक्कम, मोबाईल, चाकू आणि वॉकीटॉकी हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.
मालाड येथे राहणारे मनोज आत्माराम त्रिवेदी (४६) यांचा सातिवली येथे सुभद्रा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये कंपनी आहे. या कंपनीत काम करणारा कामगार विजय शंकर व डेव्हीड यांनी २ जूनला दुपारी पॉवरप्रेसचे मशिन दाखवण्याचे उद्देशाने सांगून त्यांना त्यांच्या गाडीतून काशीद कोपर येथे घेवून जाऊन सुमारे ७ तास बंधक बनवून गळा दाबून चाकूचा धाक दाखवुन ४ करोड रुपयाची खंडणी मागितली.
तडजोडी अंती २५ लाख रुपयाची खंडणी देण्याचे ठरले. पोलिसांना कळविले अथवा ठरलेले पैसे दिले नाही तर पत्नी व मुलांना मारुन टाकू अशी धमकी दिली होती. मनोज त्रिवेदी यांनी पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचे गांभीर्याने वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी मनोज यांचे मोबाईलवरून आरोपींना पैशाने भरलेली बॅग व्हॉट्सअप कॉल करुन दाखविली.
आरोपीने त्यांना पैसे घेऊन प्रथम लोढाधाम, बाफाने व नंतर खान कंपाऊन्ड, पेल्हार येथे बोलावले. आरोपी हे वॉकीटॉकीचा वापर करत असल्याने आरोपीचा थांग पत्ता लागत नसतांना सदर ठिकाणी सापळा रचला. आरोपींना संशय आल्याने ते पळुन जात असताना शिताफिने, कैशल्यपूर्वक पाठलाग करुन आरोपी पद्युम्न मुन्नालाल गुप्ता ऊर्फ डेव्हीड (२४), प्रदीपकुमार गुप्ता ऊर्फ विजय शंकर (३१), अनुपकुमार गुप्ता (२०) यांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपीकडून चाकुचा धाक दाखवुन घेतलेली रक्कम २९ हजार रुपये तसेच मोबाईल फोन, चाकू, वॉकिटॉकी असा ३६ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर कट हा मागील दोन महिन्यांपासून आखल्याचा व दोन आरोपी नाव बदलून कंपनीत कामाला लागल्याचे पोलीस तपासात सांगितले.
सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पेल्हार पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्दे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महेंद्र शेलार व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सनिल पाटील, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, रवि वानखेडे, किरण आव्हाड, निखिल मंडलिक, संजय मासाळ, अनिल साबळे, दिलदार शेख, नामदेव ढोणे आणि सोहेल शेख यांनी केली आहे.
खंडणी प्रकरणी तीन भावांना अटक केली आहे. तिन्ही आरोपींना १२ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. - वसंत लब्दे, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे)