सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-२, शिरू चौकातील विजयालक्ष्मी ज्वलर्स दुकानात वॉचमनने साथीदाराच्या मदतीने तब्बल ३ कोटी २० लाखाचे सोने लंपास केल्याचा प्रकार २८ जून रोजी उघड झाला. गुन्ह्याला १७ दिवस उलटूनही चोरांचा ठावठिकाणा न लागल्याने, पोलिस कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे.
उल्हासनगर शिरू चौक परिसरात प्रसिद्ध सोनार गल्ली असून याठिकाणी सोन्याचे दागिने बनविले जातात. मुंबई, ठाणे आदी मोठ्या शहरातून येथे सोन्याचे दागिने बनविण्याची प्रक्रिया सुरू असते. सोनार गल्लीच्या बाजूच्या मुख्य रस्त्यावर विजयालक्ष्मी ज्वलर्स नावाचे सोन्याचे दुकान असून दुकानाचा जुना वॉचमन सोडून गेल्याने, दुकानदार यांनी महेश नावाच्या नेपाळी वॉचमनला कामाला ठेवले. वॉचमन महेश नेपाळी यांनी पत्नी व नेपाळी साथीदारांच्या मदतीने २८ जून रोजी रात्री वॉचमन खोलीतून विजयालक्ष्मी ज्वलर्सचे दुकानाची भिंत पाडून प्रवेश केला. तसेच दुकानातील सोन्याची दागिने व लोखंडी तिजोरी गॅस कटर्न कापून ३ कोटी २० लाखाची तब्बल ३ किलोचे सोन्याचे दागिने लंपास केले.
विजयालक्ष्मी दुकानातून सोन्याची दागिने चोरून नेताना नेपाळी वॉचमन महेश, त्याची पत्नी व तीन साथीदार सिसिटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. मात्र त्यानंतर ते कुठे गेले. याबाबतची माहिती व सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे काम पोलीस पथक करीत आहेत. चोरांच्या शोधासाठी पोलीस पथक उत्तरप्रदेश याठिकाणी गेले असून अधिकृत परवानगी नंतर पोलीस पथक नेपाळला जाणार असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त अजय कोळी यांनी दिली. याबाबत विजयालक्ष्मी ज्वलर्सचे दुकानदार यांच्या संपर्क साधण्याचा प्रयत्न असता, त्यांनीचोरीचा तपास सुरू असल्याने जास्त बोलता येत नाही. असे सांगून बोलणे टाळले आहे. तर उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे यांनी पोलीस पथके चोरांच्या मार्गावर असल्याचे सांगून, तपास करण्यास विविध अडचणी येत असल्याची कबुली त्यांनी दिली. या चोरीच्या घटनेत चौघे जण नव्हेतर ८ ते ९ जणांची टोळी असेल अशी शक्यता पोलीस अधिकारी पुलपगारे यांनी व्यक्त केली आहे.
मोठ्या चोरीच्या मागे नेपाळी गँग शहरात मुकुट फायनन्स, भाटिया चौकातील उघोजग व शाहू उड्डाणफुल येथील एका फायनन्स दुकानाच्या चोरी मागे नेपाळी गँग असल्याचे उघड झाले. विजयालक्ष्मी दुकानाच्या चोरीमागेही नेपाळी गँग असल्याचे उघड झाले.