मुंबई : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने गेल्या दोन आठवडयांत शहरातील विविध भागांत धडक कारवाई करत एमडी, चरस, हेरॉईनसह सुमारे ३ कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्स जप्त केले आहे. या कारवाईत पथकाने एकूण १५ गुन्हे नोंदवत २३ ड्रग्स तस्कर, विक्रेत्यांना अटक केली. पोलिस उपायुक्त प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
जप्त मुद्देमाल...पोलिसांच्या कारवाईत ८४९ ग्रॅम एमडी, सव्वा किलो चरस, ९२.४ ग्रॅम हेरॉईन आणि २८० ग्रॅम गांजा आदी ड्रग्स जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे अमली पदार्थांचे राज्य, परराज्यांतील स्रोत आणि तस्कर टोळीतील अन्य साथीदारांबाबत कसून चौकशी सुरू आहे.
१२ तासांत... गेल्या १२ तासांत अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कांदिवली, वरळी आणि आझाद मैदान कक्षातील अधिकाऱ्यांनी उपलब्ध गोपनीय माहिती आधारे शहरातील विविध भागांत सापळे रचले होते.
दहिसर : कांदरपाडा भागातून दोन तरुणांना ७७ ग्रॅम एमडीसह अटकमाझगाव : परिसरातून अन्य एका तरुणास ४६ ग्रॅम एमडीसह पकडण्यात आले. ट्रॉम्बे : चिता कॅम्प परिसरात ई-सिगारेटची खुलेआम विक्री करणाऱ्या दुकानावर छापा घालण्यात आला. त्यात पाच लाख रुपये किंमतीच्या ३०१ ई सिगारेट, ४०२ वापरलेले रिकामे ई सिगारेट, १३० ई. सिगारेट बॅटरी-फिल्टर, ३०३ ई सिगारेट फ्लेवर, ९ ई सिगारेट बॅटरी चार्जर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
७१ लाखांचा एमडी जप्त गुन्हे शाखेच्या कक्ष १२ ने गुरुवारी अंधेरीतून दोघांना अटक करत ७१ लाख किमतीचा एमडी साठा जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करत अधिक तपास सुरू आहे.