मीरारोड - आधी महिलेने एका ५७ वर्षीय व्यक्तीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याची आणि नंतर तोतया पोलिसांनी त्याच्याकडून खंडणी उकळल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी भाईंदरच्या नवघर पोलिसांनी चार जणांच्या टोळीला अटक केली आहे.
वसईच्या अंबाडी मार्गावर अनंत किरण इमारतीत राहणारे व्यावसायिक ५७ वर्षीय प्रमोद रवीशंकर रावल यांना एक महिन्यापूर्वी ज्योती नावाच्या एका महिले व्हट्सअॅप कॉल करून भाईंदर पूर्वेच्या शिर्डी नगर येथे भेटण्यासाठी बोलावले होते. तिने त्यांना साई पराग इमारतीच्या तळ मजल्यावरील खोलीत नेले. महिलेने रावल यांच्याशी शारीरिक लगट सुरू केली तोच तीन इसम आले आणि आपण पोलीस असून तुम्ही सेक्स रॅकेट चालवित आहात, पोलीस ठाण्यात चला तुमच्यावर कारवाई करतो, असे धमकावून ५ लाखांची मागणी केली. २ लाखांवर तडजोड झाल्यानंतर रावल यांच्या कडून त्यावेळी ४५ हजार व एटीएम ने २५ हजार असे ७५ हजार उकळले .
२५ मार्च रोजी रावल याना पुन्हा पोलीस असल्याचा कॉल आला व उर्वरित पैशांची मागणी करण्यात आली. रावल यांनी नवघर पोलीस ठाण्यात जाऊन सर्व हकीकत सांगितली. उर्वरित पैसे घेण्यास तोतया पोलिसांना काशीमीराच्या वेस्टर्न हॉटेल जवळ बोलावले असता सहाय्यक निरीक्षक योगेश काळे, उपनिरीक्षक संतोष धाडवे सह भुषण पाटील, गणेश जावळे, संदीप जाधव, ओमकार यादव, सुरज घूनावत, विनोद जाधव यांच्या पथकाने सापळा रचला. पैसे घेण्यास आलेल्या विजय तुकाराम पाटील (५६) रा. चंद्रकांत इमारत, वरद विनायक लेन, विरार पूर्व व आयुब रेहमान खान (४५) रा. जय शिव पॅलेस, नवघर रोड, भाईंदर पूर्व या दोघांना पोलीस पथकाने अटक केली. त्यांच्या कसून चौकशीनंतर सुदर्शन बिभीषण खंदारे (३२) रा. आदर्श इंदिरा नगर, नवघर, भाईंदर पूर्व व ज्योती नावाचे कॉल करणारी समीना इम्तीयाज शेख (३५) रा. साई ज्योती, आचोळे रोड, नालासोपारा पुर्व या अन्य दोघं साथीदारांनासुद्धा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.