जयपूर - PUBG खेळण्याच्या नादात अल्पवयीन तरुणाने त्याच्या घरचे 3 लाख रुपये उडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजस्थानमधील झालावाडमध्ये ई-मित्र दुकान चालवणाऱ्या एका तरुणाने अल्पवयीन मुलाला धमकावत त्याच्याकडून 3 लाख रुपये उकळल्याची घटना घडली आहे. शाहबाज खान असं या आरोपीचे नाव आहे, तो तरुण अल्पवयीन तरुणाकडून पैसे उकळत असल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे.
पब्जी गेम खेळण्याच्या मोह असलेला अल्पवयीन तरुण हा त्याच्याशेजारी ईमित्र दुकान चालवणाऱ्या शाहबाज खानकडे वारंवार जात येत असे. याच काळात पब्जीसाठी लागणारी शस्त्रं आणि इतर ऑनलाईन साहित्य करण्यासाठी पैसे खर्च करण्याची सवय त्याने अल्पवयीन मुलाला लावली. हे सगळं खरेदी करण्यासाठी रेफरल कोड घेण्यासाठी तो पैसे मागायचा आणि पब्जी खेळण्याच्या नादात अल्पवयीन मुलगा त्याला पैसे आणून देत असे.
शाहबाज खानने अल्पवयीन मुलाकडून त्याच्या वडिलांच्या बँकेचे डिटेल्स मागवून घेतले. त्याचप्रमाणे त्यांचं पॅन कार्ड, आधार कार्ड आणि मोबाईल नंबरदेखील घेतला. त्यानंतर या सगळ्याचा वापर करून पेटीएम अकाउंट सुरु केले. त्यासाठी स्वतःचा नवा नंबर रजिस्टर केला. सुरुवातीला आरोपीनं अल्पवयीन तरुणाला 500 रुपयांचं ट्रॅन्झॅक्शन करवून घेतलं आणि त्यानंतर एकमागून एक अनेक व्यवहार केले. त्यामुळे मुलांच्या वडिलांचं 3 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे खात्यातून गायब झाले. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.