अहमदाबाद - अमेरिकेच्या न्यूजर्सी इथं धक्कादायक घडली आहे. आजी-आजोबानं त्यांच्या मुलीच्या मुलाला अमेरिकेत शिक्षणासाठी बोलावले. त्यानेच आजी-आजोबांसह मामाची गोळी झाडून हत्या केली. न्यूजर्सीहून ट्रिपल मर्डरची बातमी गुजरातला आल्यानंतर इथं शोककळा पसरली. गुजरात पोलीस खात्यात निरिक्षक म्हणून काम केल्यानंतर हे कुटुंब अमेरिकेत शिफ्ट झाले होते. मुलीच्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे यासाठी कुटुंबाने त्याला अमेरिकेला बोलवून घेतले. कुटुंबाने नातवाला त्यांच्यासोबत घरात ठेवले.
न्यूजर्सी पोलिसांना २७ नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता गोळीबारीचा घटना घडल्याची माहिती मिळाली. जोपर्यंत पोलीस घटनास्थळी पोहचली तोवर दिलीप ब्रह्मभट आणि त्यांची पत्नी बिंदू ब्रह्मभट यांचा मृत्यू झाला होता. तर त्यांचा मुलगा यश ब्रह्मभट यांची अवस्था नाजूक होती. यश यांना हॉस्पिटलला घेऊन गेले परंतु उपचारावेळी त्याचा मृत्यू झाला. या हत्येत पोलिसांनी ब्रह्मभट कुटुंबासोबत राहणाऱ्या ओम ब्रह्मभटला आरोपी बनवले. या हत्येमागे नेमका हेतू काय याचा पोलीस शोध घेत आहेत. तपास न्यूजर्सीची साऊथ प्लेनफिल्ड पोलीस करत आहे. मृत कुटुंब कोपोला ड्राइव्ह येथे एका अपार्टमेंटला राहायला होते.
घटनेत मृत दिलीप ब्रह्मभट हे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी होते आणि त्यांनी बिलिमोरा येथे उपनिरिक्षक म्हणून काम केले होते. सेवानिवृत्तीनंतर काही काळ आणंदला वास्तव्यात आले. त्यानंतर ते यूएसला शिफ्ट झाले. अमेरिकन मीडियानुसार, हत्येतील आरोपी ओम ब्रह्मभटने पोलिसांना फोन केला होता. पोलीस तिथे पोहचल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला. ओम ब्रह्मभट हा केवळ २३ वर्षाचा तरुण आहे. ३ जणांच्या हत्येनंतर त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला नाही. घरात बसून तो पोलिसांची वाट पाहत होता. मृतांवर झोपेत असताना गोळीबारी केली. ओम काही दिवसांपूर्वीच ब्रह्मभट कुटुंबासोबत राहायला आला होता असं त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितले. आरोपी ओमनं गुन्ह्यात वापरलेली बंदूक ऑनलाईन खरेदी केली होती. जेव्हा आरोपीला कोर्टात हजर केले तेव्हाही त्याच्या चेहऱ्यावर कुठलाच पश्चाताप दिसत नव्हता. पोलिसांनी आरोपी ओम ब्रह्मभटला मिडलसेक्स काऊंटी जेलमध्ये पाठवले.