नवी मुंबई : शिक्षणाची आवड असूनही घरचे शिकू देत नसल्याने तीन अल्पवयीन बहिणींनी व शेजारी राहणाऱ्या दोन मुलींना शिकण्यात रस नसल्याने घर सोडले. या पाचही मुलींना गुन्हे शाखेने गुंडगाव येथून सुखरूपणे नवी मुंबईत आणले. या मुलींना महिला व बालकल्याण समितीच्या ताब्यात दिले असून पुढील तपास सुरू असल्याचे तपासी पथकाने सांगितले.
तळोजातून एकाच वेळी पाच अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची नोंद झाल्याने पोलिसांनी गांभीर्याने घेतले होते. त्यामुळे अपहरणाचा गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, सहायक निरीक्षक नीलम पवार, यांच्यासह पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्या मुली वांद्रे येथे गेल्याचे दिसून आले. रेल्वे प्रवाशांच्या यादी तपासली असता त्या गुडगावला असल्याचे समजले.
७ महिन्यांपासून त्यांची सुरू हाेती तयारी
यातील जुहू (१४, बदललेले नाव) हिला सात बहिणी असल्याने घरच्यांनी त्यांचे शिक्षण थांबवले होते. परंतु, त्यांना शिक्षणाची आवड असल्याने एक महिन्यापासून तमन्नाने सात व पाच वर्षाच्या बहिणीसोबत पळून जायची तयारी चालवली होती. त्यातच शेजारी राहणाऱ्या रिया (१६ बदललेले नाव) व प्रियंका (१४) यांना शिक्षणाची आवड नसल्याने व घरचे वातावरण चांगले नसल्याने त्यादेखील त्यांच्यासोबत पळून जायला तयार झाल्या होत्या. त्यानुसार ३ फेब्रुवारीला पाचही मुलींनी घर सोडून थेट गुडगाव गाठले होते.