मंगेश कराळे
नालासोपारा - घरात धनसंपत्ती यावी, धनाढ्य होण्यासाठी गैरसमजुतीतून अंधश्रद्धेपोटी दुर्मिळ वन्य प्राण्यांना पाळून त्यांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एकाला मांडवी वनविभागाने बुधवारी रात्री कारवाई करत एका आरोपीला अटक केले आहे. आचोळे रोडवरील डॉन लेन येथील एका घरात केलेल्या कारवाईत पथकाने अतिशय दुर्मिळ असे तीन वेगवेगळे साप, ४० विंचू, १ कासव, १ पाल, ३ सरडे या प्राण्यांची सुटका केली आहे. अटक एका आरोपीला गुरुवारी न्यायालयात हजर केल्यावर दोन दिवसांची कोठडी दिल्याची माहिती मांडवी वनक्षेत्र अधिकारी यांनी दिली आहे.
वनविभागाचे वनपरिक्षेत्र प्रशांत देशमुख यांना नालासोपाऱ्यातील डॉन लेन येथील एका घरात दुर्मिळ प्रजातीचे प्राणी असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे मांडवी वनधिकारी, कर्मचारी यांच्या मदतीने त्या घरावर धाड मारली. अजीम खान (२६) या प्राणी विक्री करणाऱ्याला ताब्यात घेतले. त्याच्या घरातून तीन वेगवेगळे साप, ४० विंचू, १ कासव, १ पाल, ३ सरडे असे दुर्मिळ प्राणी हस्तगत केले आहे. या प्राण्यांची किंमत बाजारात लाखो रुपयांची असल्याचे कळते.
हे प्राणी शोभेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाळलेले असल्याचे तपासात आरोपीने सांगितले आहे. वन अधिकाऱ्यांनी भारतीय वन्यजीव अधिमियम १९७२ कलम ९, ३९, ४०, ४८, ५०, ५१ या नुसार गुन्हा दाखल झाला आहे. वनविभागाचे वनपरिक्षेत्र प्रशांत देशमुख यांनी नागरिकांना आवाहन केले आहे कि, घरात धनप्राप्तीसाठी अशा प्रकारे वन्यप्राणी पाळतात. नागरिकांनी अंधश्रद्धेमध्ये अडकू नये. अन्यथा त्यांच्यावर वन्यप्राणी अधिनियम १९७२ नुसार कारवाई होईल असे आवाहन केले आहे.