नाशिक/अहमदनगर : एक कोटी रुपयांची लाच घेताना अहमदनगर येथील राज्य औद्योगिक विकास महामंडळाचा सहायक अभियंता अमित गायकवाड (३२) याला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी रंगेहाथ ताब्यात घेतले. यातील दुसरा आरोपी तत्कालीन उपअभियंता गणेश वाघ सध्या फरार आहे.
रविवारी गायकवाड व वाघ यांच्या मूळ गावातील घरांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने छापा टाकून तपासणी केली. गायकवाड याच्या अहमदनगर जिल्ह्यातील चिंचोली (ता. राहुरी) येथील घरी एक पथक दाखल झाले. मात्र, तेथे पोलिसांना काहीही आढळून आले नाही. तर, वाघ याच्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील घराचीही पोलिसांनी झाडाझडती घेतली. मात्र, तेथेही काही आढळून आले नाही.
मुळा धरणापासून अहमदनगर एमआयडीसीपर्यंत पाण्याची पाइपलाइन बदलण्यासाठी ठेकेदाराचे अडीच कोटींचे बिल देण्यासाठी एक कोटीची लाच गायकवाडने मागितली होती. हे बिल काढण्यासाठी तत्कालीन उपअभियंता व सध्या धुळे येथे कार्यरत वाघ याची स्वाक्षरी आवश्यक होती. यासाठी लाचेच्या रकमेपैकी निम्मी रक्कम वाघ याला देण्यात येणार होती.
पुणे, धुळे, छत्रपती संभाजीनगरात घरेफरार वाघचे पुण्यातील घर पथकाने सील केले आहेत. एसीबीने त्याच्या स्थावर मालमत्तेचा शोध घेण्यास सुरुवात केली असून पुणे, धुळे, छत्रपती संभाजीनगर येथील घरे सील करण्याची तयारी सुरू केली आहे.
नगरच्या घरातही सापडले नाही काहीगायकवाड याचे राहुरी हे मूळ गाव असून, तेथेही रविवारी एक पथक रविवारी रवाना झाल्याचे सूत्रांकडून समजले. अहमदनगरच्या नागापुरातील आनंदविहार येथील घरात फारसे काही हाती लागलेले नाही.
वाघच्या लवकरच मुसक्या आवळू : एसपीकारवाईची माहिती मिळताच वाघ हा मुंबईहून पुण्याला येत असताना फरार झाला. तसेच त्याचे पुण्यातील घरदेखील लॉक करून त्याचे कुटुंबीयही निघून गेले आहेत. पथके सर्वत्र शोध घेत असून, लवकरच वाघ यांना ताब्यात घेण्यास यश येईल, असे पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी सांगितले.