12 किलो स्फोटकांसह 3 दहशतवाद्यांना अटक, 'या' शहरात साखळी बॉम्बस्फोटचा रचला होता कट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 06:03 PM2022-03-31T18:03:40+5:302022-03-31T18:19:37+5:30
ATS Arrested 3 terrorist : या प्रकरणी पोलिसांनी आणखी पाच जणांना ताब्यात घेतले असून, त्यापैकी दोघे मध्य प्रदेशचे रहिवासी आहेत. यासोबतच पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनाचीही मध्य प्रदेशात नोंद आहे.
जयपूर - राजस्थान पोलिसांनी चित्तोडगड जिल्ह्यातील निंबाहेरा शहरात एका वाहनातून 12 किलो स्फोटक सामग्री जप्त केली असून या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आणखी पाच जणांना ताब्यात घेतले असून, त्यापैकी दोघे मध्य प्रदेशचे रहिवासी आहेत. यासोबतच पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनाचीही मध्य प्रदेशात नोंद आहे.
12 किलो स्फोटकांसह 'या' वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत
पोलिसांचे दहशतवाद विरोधी पथक आणि विशेष टास्क फोर्स (ATS-SOG) यांनी गुरुवारी एका निवेदनात ही माहिती दिली. त्यानुसार निंबाहेरा शहरात पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी दरम्यान एका संशयास्पद वाहनाला अडवून त्याची झडती घेतली असता त्यात एकूण 12 किलो स्फोटके, बॅटरीसह तीन चालणारे घड्याळ आणि वायरसह तीन कनेक्टर आदी साहित्य जप्त करण्यात आले.
एटीएस आरोपींची चौकशी करत आहे
पोलिसांनी स्फोटक पदार्थ कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि या प्रकरणाचा दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) तपास करत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनानुसार, या संदर्भात तीन जणांना अटक करण्यात आली आहे, तर इतर पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे, त्यापैकी दोनजण मध्य प्रदेशातील रतलाम येथील रहिवासी आहेत, त्यांची तिथली एटीएस चौकशी करत आहे. राजस्थानमध्ये अटक करून ताब्यात घेतलेल्या आरोपींना जयपूरला आणण्यात आले आहे.
सिरीयल स्फोटाची कट आखण्यात आला होता
प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे की, आरोपी जयपूरमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचत होते, त्यासाठी चित्तोडगडच्या निंबाहेरा येथे बॉम्ब बनवण्याचे काम सुरू होते. आरोपींची ओळख उघड करण्यात आलेली नाही आणि ते कोणत्या संघटनेशी संबंधित आहेत हे अद्याप समजू शकलेले नाही. या तिघांचाही दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा पोलिसांना आणि एटीएसचा संशय आहे, मात्र आतापर्यंत आरोपींनी कोणत्याही दहशतवादी संघटनेचे नावही घेतलेले नाही.