वास्को- नवीन वर्षाच्या पहील्याच आठवड्यात वास्को पोलीसांनी उत्तम कामगिरी बजावून गोव्यात झालेल्या तीन वेगवेगळ्या चोरी प्रकरणाचा छडा लावून चोरीला गेलेली मालमत्ता सुद्धा जप्त केली आहे. गुरूवारी (दि. २) मध्यरात्रीनंतर मंगोरहील भागात संशयास्पद फिरणाऱ्या दोन तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून तपासणी केली असता कळंगुट तसेच मुरगाव अशा दोन वेगवेगळ्या ठिकाण्यावरील घरात झालेल्या चोरी प्रकरणातील मालमत्ता त्यांच्याकडून सापडली. तपासणीच्या वेळी कळंगुट येथील घरात झालेल्या चोरी प्रकरणात अन्य एका युवकाचा हात असल्याचे पोलीसांना स्पष्ट झाले असून त्याला गजाआड केला असता वास्को भागातून चोरीला गेलेली दुचाकी त्या युवकाकडे सापडली.
नवीन वर्षाच्या पहील्या आठवड्यातच वास्को पोलीसांनी गोव्यात झालेल्या तीन चोरी प्रकरणातील संशयितांना गजाआड करून त्यांच्याकडून चोरलेली बहुतेक मालमत्ता जप्त करून उत्तम कामगिरी केली आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पोलीस निरीक्षक निलेश राणे यांना संपर्क केला असता गुरूवारी मध्यरात्रीनंतर (१ वाजण्याच्या सुमारास) पोलीसांकडून गस्ती करण्यात येत असताना त्यांना मंगोरहील भागात दोन तरुण संशयास्पद फिरत असल्याचे दिसून आले. त्यांना त्वरित ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता सदर तरुणांची नावे प्रशांत मदार (वय २७, रा: जीआरबी कॉलनी सडा - मुरगाव) व बाशीद खान (वय २०, रा: जीआरबी कॉलनी सडा - मुरगाव) अशी असल्याचे समजले. यानंतर या दोन्ही तरुणांची कसून तपासणी केली असता पोलीसांना त्यांच्याकडून विविध सोन्याचे ऐवज (अंगठ्या, सरपळी इत्यादी) तसेच विविध इमिटेशन ज्वेलरी व एक हातातले घड्याळ सापडले. एवढी सामग्री कुठून आली याबाबत पोलीसांनी त्यांच्याशी चौकशी केली असता त्यांच्याशी सापडलेले दोन लाख रुपयांचे सोन्याचे ऐवज कळंगुट येथील घरात चोरी करून त्यांनी लंपास केले असल्याची कबूली त्यांनी पोलीसांना दिली असल्याची माहीती पोलीस निरीक्षक निलेश राणे यांनी दिली.
सदर चोरी ३१ डिसेंबर रोजी त्यांनी केली होती असे तपासणीच्या वेळी पोलीसांना जाणवले. याबरोबरच पोलीसांना प्रशांत व बाशीद यांच्याकडून इमिटेशन ज्वेलरी तसेच अन्य सामग्री सापडली असून ती कुठून आली याबाबत चौकशी केली असता ३० डीसेंबर रोजी सडा, मुरगाव येथील रुपा रोहीदास नाईक यांच्या घरात झालेल्या चोरी प्रकरणातील असल्याचे त्यांनी कबूलीत सांगितल्याची माहीती निरीक्षक राणे यांनी दिली. नाईक यांच्या घरातून काही सोन्याचे ऐवज व दहा हजार रुपयांची रोख रक्कम सुद्धा चोरट्यांनी लंपास केली असून सदर ऐवज व रक्कम कुठे आहे याबाबत चौकशी करण्यात आली असता ऐवज विकले असून रोख रक्कम खर्च केल्याचे पोलीसांना पुढे माहीतीत समजले. मुरगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाºया सडा भागातील घरात झालेल्या चोरी प्रकरणात प्रशांत व बाशीद यांचा हात असून कळंगुट पोलीस स्थानकाच्या हद्दीतील घरात झालेल्या चोरी प्रकरणात यांच्यासहीत खारीवाडा, वास्को येथील १८ वर्षीय सोहेल खान याचा हात असल्याचे पोलीसांना चौकशीच्या वेळी समजले. कळंगुट येथे झालेल्या चोरी प्रकरणातील तिसरा संशयित सोहेल याच्याशी वास्को पोलीस स्थानकाच्या हद्दीतून चोरीला गेलेली दुचाकी असल्याचे चौकशीत समजल्यानंतर शुक्रवारी (दि.३) सकाळी ११ वाजता त्याला ताब्यात घेऊन नंतर अटक केली. तसेच चोरीला गेलेली दुचाकी त्याच्याकडून जप्त करण्यात आलेली ती दुचाकी त्यांनेच चोरल्याची कबूली दिली असल्याची माहीती निरीक्षक निलेश राणे यांनी दिली.
संशयास्पद फिरणाºया त्या दोन तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केल्याने वास्को पोलीसांना तीन वेगवेगळ्या भागात झालेल्या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यास यश प्राप्त झाले असून याबरोबरच कळंगुट भागातील घरातील चोरी प्रकरणातील तिसरा संशयित तथा वास्कोतील दुचाकी चोरी प्रकरणातील संशयित सोहेल खान यास गजाआड करण्यास यश प्राप्त झाले. दरम्यान मुरगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या रुपा रोहीदास नाईक यांच्या घरात झालेल्या चोरी प्रकरणातील पुढचा तपास करण्यासाठी मुरगाव पोलीसांनी कायदेशीर सोपस्कार करून शुक्रवारी (दि. ३) संध्याकाळी संशयित प्रशांत मदार व बाशीद खान यांना ताब्यात घेतले असल्याचे निरीक्षक निलेश राणे यांनी माहीतीत पुढे सांगितले. गजाआड करण्यात आलेल्या या तिनही संशयितांचा अन्य काही चोरी प्रकरणात समावेश आहे का? याबाबतही पोलीस चौकशी करीत असल्याचे निरीक्षक राणे यांनी माहीतीत शेवटी सांगितले.