शिरपूर: पोलिसांनी शहरातील कॅफेंची (कॉफी हाऊस) शुक्रवारी झाडाझडती घेतली. त्यात करवंद रोडवर असलेल्या एका कॅफेमध्ये तीन तरूण-तरुणी गैरप्रकार करताना आढळून आले. पोलिसांनी त्या तरुण-तरुणींना ताब्यात घेत, त्यांना समज देऊन नातेवाइकांच्या हवाली केले. दरम्यान, कॅफेचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडालेली आहे. शहरात कॅफेच्या नावाखाली गैरप्रकार सुरू असल्याची चर्चा होती.
त्यातच आ. अमरिशभाई पटेल यांनी असे गैरप्रकार शहरात खपवून घेतले जाणार नाही असा इशारा दिला होता. त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली. शहरातील कॅफेमध्ये तरुण मुला- मुलींना गैरप्रकार करण्यास जागा उपलब्ध करून दिली जाते अशी माहिती पोलिस निरीक्षक ए. एस. आगरकर यांना मिळाली. याचा तपास करण्यासाठी त्यांनी पोलिसांचे चार पथक तयार केले. या पथकाने शहरातील करवंद परिसर, करवंद रोड, निमझरी नाका, निमझरी रोडवरील कॅफेची शुक्रवारी दुपारी झाडाझडती घेतली.
ही कारवाई पोलिस निरीक्षक ए. एस. आगरकर, पोउनि किरण यान्हे, संदीप मुरकुटे, गणेश कुटे, पोहेकॉ ललित पाटील, लादूराम चौधरी, मनोज पाटील, चेतन सोनवणे, भूपेश गांगुर्डे, सनी सरदार, उमाकांत वाघ, स्वप्निल बांगर, अमित रणमले, विनोद आखडल, गोविंद कोळी, प्रशांत पवार, पौर्णिमा पाटील, प्रतिभा देशमुख, पूजा सारसर, अनिता पावरा यांनी केली आहे. याप्रकरणी चौकशी सुरु आहे.
तरुण-तरुणींना जागेवरच दिली समज
त्यात करवंद रोडवरील ड्रीम कॅफेमध्ये तरुण मुला-मुलीचे ३ जोडपे गैरकृत्य करताना आढळून आले. या तरुण-तरुणींना पथकाने ताब्यात घेतले. तरुण- तरुणींच्या नातेवाइकांना पोलिस स्टेशनमध्ये बोलावून तरुण-तरुणींना समज देऊन त्यांना नातेवाइकांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल भूपेश गांगुर्डे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ड्रीम कॅफेचालक अरविंद पदमसिंग राजपूत (वय ३४, रा. आमोदे) याचेविरुद्ध शिरपूर शहर पोलिस ठाण्यात भादंवि कलम २९० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.