खामगाव: शहर आणि परिसरात रेशन तांदळाचा काळाबाजार गत काही दिवसांपासून वाढत असल्याचे दिसून येते. बुधवारी रात्री साडेआठ वाजता दरम्यान लाभार्थ्यांकडून खरेदी केलेला तांदूळ एका वाहनांतून नेत असताना पोलीसांनी पकडला. या कारवाईत साडेतीन लक्ष रुपये किंमतीच्या वाहनासह ४२ हजार रुपयांचा तांदूळ जप्त करण्यात आला. याप्रकरणी कार चालकासह आणि एका विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे खामगाव तालुक्यातील रेशन माफीयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
खामगाव आणि परिसरात गत काही दिवसांपासून रेशन तांदळाचा काळाबाजार वाढीस लागला आहे. दोन दिवसांपूर्वीच पळशी परिसरात ३४ क्विंटल तांदूळ जप्त करण्यात आला. त्यानंतर बुधवारी रात्री शहर पोलिसांनी स्थानिक विकमशी चौकातून ३० क्विंटल रेशनचा तांदूळ असलेले एमएच १९ एस ७४९७ क्रमांकाचे मालवाहू वाहन पकडले. यावेळी आरोपीचा तीन हजार रूपये किंमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला. उप विभागीय अधिकारी पथकातील पो.ना. सुधाकर थोरात यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी विठ्ठल शांताराम व्यवहारे (१९, रा. वाडी) आणि विजय लक्ष्मण काळबांडे (५४, रा. चांदमारी) यांच्या विरोधात शहर पोलीस स्टेशनमध्ये जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या कलम ३, ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
लाभार्थ्यांकडून तांदळाची खरेदी
रेशनच्या लाभार्थ्यांकडून तांदळाची खरेदी केल्यानंतर हा तांदूळ विक्रीसाठी नेत असतानाच पोलीसांनी विजय लक्ष्मण काळबांडे याला रंगेहात पकडले. हा तांदूळ वाडी येथील गोदामात साठविण्यात येत असल्याचा दावा पोलीस सुत्रांनी केला. वाडी येथून निपाणा आणि त्यानंतर नांदुरा मार्गे मध्यप्रदेशात या तांदळाची विक्री करणाºया एका रॅकेटचा काही दिवसांपूर्वीच पोलीसांनी पर्दाफाश केला होता. त्यानंतर आणखी याच रॅकेटच्या माध्यमातून रेशनचा काळाबाजार वाढीस लागल्याची चर्चा पोलीस वर्तुळात होत आहे.