लखनौ - उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे कोरोना काळात नोकरी गेल्यामुळे एका युवकानं आत्महत्या केली आहे. युवकानं घेतलेल्या टोकाच्या निर्णयानं कुटुंबाला मोठा धक्का बसला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी तपास सुरू केला असता युवकानं मृत्यूपूर्वी लिहिलेली सुसाइड नोट पोलिसांच्या हाती लागली. यात युवकानं त्याच्या आईसाठी लिहिलेला संदेश पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, अलीगंज येथे राहणाऱ्या ३० वर्षीय युवक विवाहित होता. रत्नेश हा त्याची पत्नी सौम्या आणि मुलीसोबत राहत होता. रत्नेश हा खासगी कंपनीत काम करत होता. घरात आई आणि वडील पण राहायचे. घटनेच्या दिवशी सकाळी जेव्हा रत्नेशनं त्याच्या खोलीचा दरवाजा उघडला नाही तेव्हा वडिलांनी शेजारच्यांना बोलावून दरवाजा तोडला. खोलीत आतमध्ये पाहताच आई-वडिलांना जबर धक्का बसला. रत्नेशनं गळफास घेत आत्महत्या केली होती. घटनेच्या दिवशी त्याची पत्नी आणि मुलगी माहेरी होत्या.
युवकानं आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइड नोट लिहिली होती. त्यात म्हटलं होतं की, आई मला माफ कर, माझ्या मुलीची काळजी घे आणि जे काम मी या जन्मात करू शकलो नाही ते पुढील जन्मात तुझा मुलगा बनून पूर्ण करेन असं त्याने सांगितले. परंतु नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, कोरोना काळात मुलाची नोकरी गेली होती. त्यानंतर अनेक प्रयत्न करूनही त्याला नोकरी मिळत नव्हती. खूप प्रयत्न केले तरीही कुठेही कमवण्याचं साधन मिळत नव्हतं. त्यामुळे तो मानसिक तणावाखाली राहू लागला. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला असून पुढील कार्यवाही केली जाईल अशी माहिती पोलीस आयुक्त डी.के ठाकूर यांनी दिली.
सॅलरी न मिळाल्यानं कर्मचाऱ्याने स्वत:ला पेटवले
दुसरीकडे गाझियाबाद येथे एका खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला सॅलरी न मिळाल्याने त्याने स्वत:ला पेटवून घेतले. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. नागेंद्र नावाचा कर्मचारी नवीन हॉस्पिटलमध्ये काम करत होता. हॉस्पिटलनं त्याला नोकरी सोडण्यास सांगितले. त्याला महिन्याचा पगारही दिला नाही. त्यामुळे नाराज होऊन त्याने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. सध्या या प्रकरणाचाही तपास सुरू असल्याचं पोलीस म्हणाले.