नवी दिल्ली - देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशातच आंध्र प्रदेशमधील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातल्या एका गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. शेक़डो भटक्या श्वानांना विष देऊन मारण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लिंगापालेम गावात 300 हून अधिक श्वानांना विष देऊन मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी प्राणी मित्र संघटनांनी लिंगापालेम गाव पंचायतीला जबाबदार धरलं आहे. श्वानांना दफन करत असताना ही घटना उघड झाली.
फाइट फॉर अॅनिमल्स एक्टिविस्ट ललिता यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच पोलीस देखील अधिक तपास करत आहेत. ललिता यांनी ग्राम पंचायतीने श्वानांची नसबंदी करण्याऐवजी त्यांना मारण्याचा निर्णय घेतला आणि विषाचं इंजेक्शन देऊन मारून टाकलं असं म्हटलं आहे. तसेच त्या गावात गेल्या होत्या. तिथे त्यांनी 300 हून अधिक श्वानांना दफन केलं जात असल्याचं पाहिलं. तसेच याचा एक व्हिडीओ देखील रेकॉर्ड केल्याचा दावा केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी धर्माजीगुडेम पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. ग्राम पंचायतीने मात्र ललिता यांचे हे गंभीर आरोप फेटाळून लावले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. पती-पत्नीतील भांडणाने एका चिमुकलीचा जीव घेतला आहे. माहेरी असलेल्या पत्नीने सोबत जाण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने आपल्याच आठ महिन्यांच्या बाळाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रागाच्या भरात पतीने बाळाला पत्नीच्या हातातून खेचून घेऊन जमिनीवर आपटलं, यानंतर बाळ गंभीररित्या जखमी झालं. मुलीला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं मात्र डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केलं. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
बिजनौर मंडावली येथील रहिवासी असलेल्या नाजिमचं राहतपूरच्या मेहताबसोबत दीड वर्षापूर्वी लग्न झालं. दोघांना एक मुलगी होती. मात्र, पतीच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे मेहताबने पतीचं घर सोडलं आणि ती आपल्या माहेरी येऊन राहू लागली. नाजिम पत्नीला घेऊन जाण्यासाठी तिच्या माहेरी पोहोचला होता. त्याने पत्नीला आपल्यासोबत येण्यास सांगितलं. मात्र त्यावेळी देखील नाजिम नशेत असल्याने दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद सुरू झाला. मेहताबने पतीसोबत जाण्यास नकार दिला. याच कारणामुळे रागावलेल्या नाजिमने पत्नीच्या हातातून बाळ हिसकावून घेतलं आणि आठ महिन्यांच्या चिमुकलीला जोरात जमिनीवर आदळलं. या घटनेत आठ महिन्यांची चिमुकली गंभीर जखमी झाली. चिमुकलीला लगेचच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.