GST Scam: 15 हजार कोटींहून अधिकच्या GST घोटाळ्याप्रकरणी फरार आरोपी विकास डबासला पकडण्यात नोएडा पोलिसांना यश आले आहे. नोएडाच्या सेक्टर-20 पोलिसांनी आरोपीला मुबारकपूर, दिल्ली येथून अटक केली. आरोपीवर 25 हजारांचे बक्षीस ठेवले होते. या प्रकरणात आतापर्यंत 29 आरोपींना देशाच्या विविध भागातून अटक करण्यात आली आहे. नोएडा पोलिसांनी नऊ आरोपींवर प्रत्येकी 25 हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते, यामध्ये आरोपी विकासच्या नावाचाही समावेश होता.
गेल्या वर्षी जूनमध्ये नोएडा आयुक्तालय पोलिसांनी, 3 हजारांहून अधिक बनावट कंपन्या तयार करुन 15 हजार कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा पर्दाफाश केला होता. याप्रकरणी पोलिसांनी 4 हजार कोटींहून अधिक रुपयांचे आयटीसी गोठवले होते. रिपोर्टनुसार, आरोपी विकास गेल्या पाच वर्षांपासून जीएसटी क्रमांकासह बनावट फर्म तयार करत असे.
बनावट बिले वापरुन GST रिफंड टॅक्स (इनपुट टॅक्स क्रेडिट) मिळवण्यासाठी याचा वापर केला गेला. बनावट कागदपत्रे, आधार कार्ड, पॅनकार्ड, भाडे करार, वीजबिल आदींचा वापर करुन जीएसटी क्रमांकासह बनावट कंपन्या तयार करण्यात आल्या. एवढेच नाही तर त्याने स्वत: बनावट जीएसटी फर्म खरेदी केली आणि बनावट बिलांचा वापर करुन जीएसटी रिफंड घेतला.
3000 बनावट कंपन्या तयार केल्याया टोळीच्या भामट्यांनी देशातील विविध भागात 3 हजार बनावट कंपन्या तयार करून या कंपन्यांच्या नावाने इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवून सरकारला सुमारे 15 हजार कोटी रुपयांचा गंडा घातला. या कंपन्या केवळ कागदावरच होत्या, प्रत्यक्षात त्यांचे अस्तित्व नव्हते. उर्वरित आरोपींच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच, आरोपींची घरे जप्त करण्याची प्रक्रियाही सुरू आहे.