नवी मुंबई : गाड्या भाड्याने लावून महिना चांगले उत्पन्न मिळवायचे आमिष दाखवून वाहनचोरी करणाऱ्या दोघांना नेरूळ पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २ कोटी १० लाख रुपये किमतीची ३१ वाहने जप्त केली.कंपन्या अथवा कार्यालयांमध्ये गाड्या भाड्याने लावण्याचे आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार घडत होते. ताब्यात घेतलेल्या गाड्यांचा अपहार करून संबंधितांची फसवणूक केली जात होती. यासंदर्भात पोलिसांकडे तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार नेरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अशा गुन्ह्यांच्या अनुषंगाने उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक श्याम शिंदे यांनी निरीक्षक सुनील गवळी, सहायक निरीक्षक राजेंद्र घेवडेकर, सचिन मोरे आदींचे पथक तयार केले होते. या पथकाने दोघांची माहिती मिळवून त्यांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत नवी मुंबईतील पाच गुन्हे उघडकीस आले. यानुसार छोटेलाल उर्फ राजेश शर्मा (५४) व हरिदास शिलोत्रे उर्फ पाटील (४०) यांना अटक केली. शर्मा पनवेलचा, तर शिलोत्रे भिवंडीचा राहणारा आहे. त्यांनी फसवणूक करून ताब्यात घेतलेल्या गाड्या इतर ठिकाणी गहाण ठेवून त्याबदल्यात पैसे घेतले होते. अशा ३१ गाड्या पोलिसांनी जप्त केल्या असून, त्यांची किंमत २ कोटी १० लाख रुपये आहे. उघडकीस आलेल्या गुन्ह्यात नेरूळ, न्हावाशेवा, मानखुर्द, खारघर तसेच वाशी व इतर ठिकाणच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी या जप्त केलेल्या वाहनांची सोमवारी पाहणी केली. तसेच तपास पथकाच्या कार्याचेही कौतुक केले.
फसवणूक करून चोरलेली ३१ वाहने केली जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2021 11:15 AM