भोपाळ - मध्य प्रदेशमध्यी ग्वाल्हेर जिल्ह्यातील अजून चार माजी सरपंच तुरुंगात जाणार आहेत. यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या सर्वांनी शौचालयांसाठी मिळालेला निधी गिळंकृत केला होता. त्यामुळे या प्रकरणात कारवाई झालेल्या एकूण सरपंचांची संख्या ही ३५ झाली आहे. जिल्ह्यातील एकूण ६० माजी सरपंचांनी अफरातफर केली होती. यामधील २५ जणांनी नोटीस मिळाल्यानंतर पैसे परत केले होते.
ग्वाल्हेर जिल्ह्यामध्ये शौचालयासाठी मिळालेला निधी गिळंकृत करणाऱ्या तीन माजी उपसरपंचांसह एकूण चार माजी उपसरपंचांना तुरुंगात जावे लागणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष तिवारी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. तीनही माजी महिला सरपंचांनी त्यांच्या ग्रामपंचातींमधील १७० शौचालयांचे पैसे हडप केले होते. दरम्यान, अंतिम नोटिस मिळाल्यानंतरही पैसे जमा न केल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पंचायत राज अधिनियमांतर्गत माजी महिला सरपंचांना ताब्यात घेऊन तुरुंगात पाठवण्याचे आदेश दिले. ग्वाल्हेर जिल्ह्यातील सुमारे ३५ माजी सरपंचांना तुरुंगात पाठवण्याचे आदेश जारी झाले आहेत.
ग्वाल्हेर जिल्ह्यातील मऊछ ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच राजकुमारी किरार यांनी ७६ शौचालयांचा निधी गिळंकृत केला होता. गधौटा ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सुविंदर कौर यांनीही ८२ शौचालयांचा निधी गडप केला होता. तर अजून एका महिला सरपंचांनी शाळा आणि गावातील १२ शौचालयांचा निधी हडप केला होता. जिल्हा परिषदेच्या अंतिम नोटिशीनंतरही तिन्ही माजी सरपंचांनी ही रक्कम सरकारदरबारी जमा केली नाही. त्यामुळे तिन्ही माजी सरपंचांना तुरुंगात पाठवण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष तिवारी यांनी पंचायत राज अधिनियमांतर्गत एक महिन्यापर्यंत या माजी सरपंचांना तुरुंगात ठेवण्याचे आदेश दिले आहेत.