मीरारोड - हज यात्रेसाठी पाठवतो असं सांगून खोटी बतावणी करून मीरारोडमधील एका व्यक्तीकडून २४ लाख तर दुसऱ्याकडून ११ असे ३५ लाख रुपये आरोपीने घेतले. पैसे घेऊन देखील त्यांना हज यात्रेला न पाठवता फसवणूक केल्याप्रकरणी नया नगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. बाप आणि त्याची दोन मुलं आरोपी असून एका मुलास अटक केली आहे.मीरारोड येथील नया नगर भागातील पुजा नगर येथे सनराईज इमारतीत लकी टुर्स एण्ड ट्रॅव्हल्स आहे. या ट्रॅव्हल्सचा चालक अशपाक कुरेशी (५८ ) हा असून त्याची दोन्ही मुलं वसीम (३१) व मुद्दसीर (३५) असे तिघे मिळून ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करतात. हज यात्रेसाठी यात्रेकरु पाठवण्याचे काम देखील या ट्रॅव्हल्समार्फत केले जाते.नया नगरमध्ये राहणारे फक्रुद्दीन खान (६३ ) यांना यंदाच्या वर्षी हज यात्रेला जायचे असल्याने त्यांनी कुरेशी याच्या ट्रॅव्हल्सशी गेल्या वर्षी संपर्क केला होता. हज यात्रेला जाण्यासाठी गेल्या वर्षी खान यांनी २४ लाख रुपये कुरेशीला दिले होते. परंतु हजयात्रा सुरु झाली आणि संपायला देखील आली असताना कुरेशी मात्र हज यात्रेला पाठवण्यास कारणं पुढे करुन टाळटाळ करत होता. अखेर खान यांनी नया नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर मंगळवारी पोलीसांनी गुन्हा दाखल केला.पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पठाण यांनी तपास करुन मुद्दसीर याला अटक केली आहे. त्याला उद्या गुरुवार पर्यंत पोलीस कोठडी आहे. तर कुरेशीला या प्रकाराने हृदयविकाराचा झटका आल्याने त्यास रुग्णालयात दाखल केले आहे. वसीम हा हा ट्रॅव्हल्स मार्फत काही यात्रेकरुंना हज साठी घेऊन गेला असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. खान यांच्यासह नया नगर भागातील तौसिफ खान यांना देखील हज यात्रेसाठी ११ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आणखी कोणाची फसवणूक तर केली नाही ना याचा तपास पोलीस करत आहेत.
हजला पाठवतो सांगून ३५ लाखांचा घातला गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2019 7:46 PM
नया नगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ठळक मुद्देखेर खान यांनी नया नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर मंगळवारी पोलीसांनी गुन्हा दाखल केला.हज यात्रेसाठी यात्रेकरु पाठवण्याचे काम देखील या ट्रॅव्हल्समार्फत केले जाते.