मुंबई : मुंबई पोलिसांच्या १९३० सायबर हेल्पलाईनमुळे दक्षिण मुंबईतील व्यवसायिकाचे ३५ लाख १२ हजार ८२९ रुपये वाचले आहेत. कुरियर कंपन्यांच्या नावाने या टोळीने व्यावसायिकाला जाळ्यात ओढून खात्यात गैरव्यवहार झाल्याचा बनाव करत फसवणूक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ एप्रिल रोजी दक्षिण मुंबईमध्ये राहणाऱ्या व्यवसायिकाला आरोपीने पोलीस अधिकारी, आयकर अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्या बँक खात्यात अनधिकृत व्यवहार झाल्याचा बनाव केला. कारवाईची भीती घालून त्यांना ३५ लाख १२ हजार ८२० रुपये ट्रान्सफर करण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदार यांनी तत्काळ १९३० सायबर हेल्पलाईनवर संपर्क करून माहीती दिली.
त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक पोउनि भोर व पोलीस शिपाई किरण पाटील यांनी तात्काळ एनसीआरपी पोर्टलवर तक्रार दाखल करून संबधित बँकेच्या नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. या कार्यवाहीमुळे तक्रारदार यांची सायबर गुन्हयात फसवणूक झालेली संपुर्ण रक्कम रूपये संबधित बँक खात्यावर गोठविण्यास पथकाला यश आले. ही कारवाई पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहा. पोलीस आयुक्त आबुराव सोनावणे, सायबर गुन्हे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ताराम चव्हाण, पोउनि मंगेश भोर, पोलीस शिपाई किरण पाटील यांनी केली आहे.
तुमचीही फसवणूक झाली का?
सायबर गुन्हयामध्ये आर्थिक फसवणुक झाल्यास तात्काळ १९३० हेल्पलाईनवर संपर्क करावा जेणेकरून आपली फसवणूक झालेली रक्कम वाचविण्यास मदत होईल असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
कुरियर स्कॅम आहे तरी काय? अशावेळी काय करावे?
नामांकित कुरियर कंपन्याचे प्रतिनीधी असल्याचे भासवून आपले बँक खात्यांमधुन अनियमित व्यवहार झाल्याचे किंवा आपले नावे ड्रग्स, हत्यारे, हवाला ट्रान्झेक्शन झाल्याचे सांगून हे रॅकेट संपर्क साधतात. त्यामुळे अशा कॉलपासून सावधानता बाळगावी.
पोलीस अधिकारी, इन्कम टॅक्स अधिकारी किंवा इतर सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करून सोशल मिडीयाचे माध्यमातून ओळखपत्र किंवा नोटीस पाठवून आपल्याला अटक करण्यात येईल अशी भीती दाखवून जाळ्यात ओढतात. अशावेळी घाबरून न जाता थेट जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क करा.
कोणतेही आर्थिक व्यवहार करू नये किंवा अनोळखी व्यक्तीच्या व बँक खातेवर पैसे पाठवू नये.