तासगाव (जि. सांगली) : कमी दराने खाद्यतेल पुरवठा करण्याचे आमिष दाखवून कवठेएकंद (ता. तासगाव) येथील खाद्यतेलाचे व्यापारी कैलास देशमाने (वय ४७) यांना दोघांनी ३६ लाख ४० हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी तासगाव पोलिसांनी प्रशांत पवार (रा. पुणे) आणि अजय शेजल (नगर) यांना फिर्याद दाखल झाल्यानंतर २४ तासांत अटक केली.कैलास देशमाने यांचा कवठेएकंद येथे होलसेल खाद्यतेलाचा व्यापार आहे. या व्यापारासाठी पवार आणि शेजल या दोघांनी कमी दराने खाद्यतेल पुरवठा करण्याचे आमिष दाखविले. १० किलो सोयाबीन तेलाचा दर १३९० रुपये असल्याचे सांगून त्या दोघांनी देशमाने यांना विश्वासात घेतले. पैसे मिळताच तेल देण्याचे आमिष दाखवून ३६ लाख ४० हजार रुपये खात्यावर पाठविण्यास सांगितले. पैसे पाठविल्यानंतर दोघांनी तेलाचा पुरवठा न करता टोलवाटोलवी केली. पैसे परत देण्यास नकार दिला. याबाबत देशमाने यांनी पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर २४ तासांत दोन्ही आरोपींना अटक केली.
तेल व्यापाऱ्याला ३६ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 8:24 AM