कोल्हापूर - मटकाकिंग सलीम मुल्ला व त्याची पत्नी माजी उपमहापौर शमा मुल्ला यांनी मटका, जुगार या अवैध व्यवसायाच्या कोल्हापूर ते मुंबई कनेक्शनमधून मिळविलेले बेहिशोबी ३६ लाख रुपये व हिशोबाच्या वह्या पोलीसांनी हस्तगत केले आहेत. आतापर्यंत ३९ आरोपींना ‘मोक्का’कारवाईखाली अटक केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह पथकावर हल्ला करणाऱ्या ‘मुल्ला गँग’चा मुख्य म्होरक्या सलीम मुल्लासह त्याची पत्नी शमा, भाऊ फिरोज, राजू, जावेद यांच्यासह ४० जणांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दरोडा, शासकीय कामात अडथळा, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, एकत्र जमाव करून हाणामारी करणे, अवैध व्यवसाय चालविणे अशा गंभीर स्वरूपाच्या कलमांचे गुन्हे दाखल करून, संघटित गुन्हेगारीच्या कलमाखाली ‘मोक्का’ कारवाई केली आहे. मुल्ला याच्या घरझडतीमध्ये जुगार, गांजा तस्करी, सावकारकीतून बेहिशेबी मालमत्ता मिळविल्याचे निष्पन्न झाले आहे. मुल्लाने विशिष्ट टोपन नावाने कुरीअर सर्व्हीसच्या मार्फत अंगडीया सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना हाताशी धरुन आर्थिक व्यवहार पार पाडत असल्याचे निष्पन्न झाले. मटका, जुगारामधून मिळालेले पैसे मुंबईतील सावला गॅग’चा जयेश शहा व जितेंद्र गोसालीया यांना कुरीअर सर्व्हीसच्या माध्यमातून टोपन नावाने संकलीत केलेले पैसे वर्ग करतात. हे पैसे मालाड, मुंबई येथील डायमंड मार्केट मध्ये अंगडीया कंपनीकडे पाठविले जातात. ते संकलीत करण्यासाठी रवी प्रभुदास ठक्कर याचेकडे दिले जातात. तो जयेश शहा, जितेंद्र शहा व जयंतीलाल ठक्कर यांना देवून ती रक्कम रमेश कांतीलाल नावाच्या व्यक्तिकडे ठेवण्यासाठी देत होते. त्यासाठी ते मोबाईलवरुन एकमेकाच्या संपर्कात राहत असत. मुल्ला आणि सावला गॅंगच्या व्यवहाराची माहिती असणाऱ्या हिशोबाच्या वह्या व ३६ लाख रुपये हस्तगत केले. गेले सात दिवस या कारवाईमुळे मुंबई मटक्याचा आकडा निघाला नाही. तो बंद राहिला. ही कारवाई आणखी कठोर करण्यात येणार असलेचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.