आशिष सिंह
मुंबई : आठ महिन्यांपूर्वी जेएनपीटी बंदरात सापडलेल्या ३६३ कोटींच्या हेरॉईनच्या तस्करीचे धागेदोरे मुंबईसह पंजाब, दिल्लीपासून थेट पाकिस्तान, जर्मनीपर्यंत पोहोचल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती आली आहे. या तस्करीमागे एका अज्ञात आंतरराष्ट्रीय ड्रगमाफिया कार्टेलचा हात असून, या बंदरातून हे हेरॉईन आधी दिल्ली आणि तेथून पंजाबमध्ये पोहोचवण्याचा कट होता. मात्र, दोन मुख्य आरोपींपर्यंत पोहोचण्यास तपास यंत्रणांना अपयश आले आहे.
कस्टम विभागाच्या गुप्तचर यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात आंतरराष्ट्रीय ड्रगमाफियांच्या गटाने हे हेरॉईन भारतात पोहोचवण्याची जबाबदारी पाकिस्तान आणि जर्मनीच्या दोन ड्रग सिंडिकेटवर सोपवली होती. त्यासाठी भारतातील एका बड्या व्यक्तीकडून रक्कमही स्वीकारली होती. मात्र, यासंदर्भात माहिती अद्याप तपास यंत्रणांच्या हाती लागू शकलेली नाही.
हेरॉईनचा हा कोट्यवधी रुपयांचा साठा जेएनपीटी बंदरात उतरवून दिल्ली, पंजाबपर्यंत पोहोचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय ड्रग माफियांनी पाकिस्तानच्या आयएसआयच्या ड्रग सिंडिकेटमधील माफिया आदिल शाह याच्याशी कॉन्ट्रॅक्ट केले होते. त्याने हा साठा पकडला जाऊ नये, यासाठी कंटेनरच्या दरवाजांमध्ये छुपे कप्पे तयार करून तेथे हेरॉईन लपवले होते. कंटेनरमध्ये संगमरवरी फरशा भरून ते न्हावा-शेवा बंदरात पाठवले होते. हे कंटेनर दिल्लीत पोहोचल्यावर त्यातील ड्रग पंजाबपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आंतरराष्ट्रीय माफियांनी दुसऱ्या सिंडिकेटमधील जर्मनीत वास्तव्यास असलेल्या मोनू सिंग ऊर्फ मनीवर सोपवली होती. मोनू सिंग मूळचा जालंधरचा रहिवासी आहे.
मुख्य आरोपी पाकिस्तानात?तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत पकडण्यात आलेले सहा आरोपी केवळ मोहरेच आहेत. मुख्य आरोपी पाकिस्तानचा ड्रग माफिया आदिल शेख आणि जर्मनीतील मोनू सिंग ऊर्फ मनी यांच्याबाबत कोणतीच माहिती रेकॉर्डवर उपलब्ध नसल्याने ते हाती लागू शकलेले नाहीत. हे दोन फरार मुख्य आरोपीच त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट कोणी दिले होते, हे सांगू शकतील.