मुंबई - बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी तब्बल सात लाखांची लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) च्या पथकाने सोमवारी अटक केली. भरत मुंढे (३३) असे या लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून तो सध्या ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.लोअर परळ येथील ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात एका तरुणाच्या नातेवाईकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक भरत मुंढे याने या तरुणाकडे ३७ लाखांची मागणी केली. यातील पाच लाख स्वतःसाठी, दोन लाख वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसाठी आणि ३० लाख तक्रारदार तरुणीला देण्यात येतील असे मुंढे याने या तरुणाला सांगितले. इतकी मोठी रक्कम आणणार कुठून? असा प्रश्न पडल्याने या तरुणाने मुंढे याला होकार देत त्याच्याविरोधात वरळीतील एसीबीच्या कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली.एसीबीच्या पथकाने या तरुणाने दिलेल्या तक्रारीची शहानिशा केली आणि त्यानुसार सोमवारी सापळा रचला. या तरुणाकडून सात लाख रुपये घेताना भरत मुंढे याला एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पकडले. मुंढे याच्याविरुद्ध एसीबीने भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ आणि ७अ अन्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणात अधिक चौकशी सुरु असल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले.
३७ लाख दे अन् निघून जा! बलात्काराच्या आरोपीकडून पोलिसाने घेतली लाच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 2:46 PM