नाशिक : शहर व परिसरात उच्चशिक्षितांची शेअर मार्केटमधील स्टॉकद्वारे आमिष दाखवून गुंतवणूकीला भाग पाडत होणारी लाखो रूपयांची फसवणूक अद्यापही थांबलेली नाही. शहर सायबर पोलिसांकडे अशाप्रकारच्या तक्रारींचा ओघ अजूनही सुरूच आहे. शहरातील एका सॉफ्टवेअर इंजिनिअर युवकाला ३६ लाख ७० हजार रूपयांना ऑनलाइन चुना लावला. याप्रकरणी योगेश प्रविण मुर्डेश्वर (३६,रा.पंचवटी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुर्डेश्वर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते सॉफ्टवेअर इंजिनिअर असून त्यांना १९ मार्च ते १५ मे २०२४ या कालावधीत सायबर गुन्हेगारांनी विविध स्टॉकच्या नावाने टेलिग्राम, व्हॉट्सॲपच्या ग्रुपचे ग्रूप ॲडमीन असलेले संशयित प्रा.रोहन कुलकर्णी, व त्यांचा सहायक राजेश पंडीत यांनी दोन वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून संपर्क साधला. यानंतर त्यांना त्या ग्रूपवर शेअर मार्केट ट्रेडिंग, ब्लॉक ट्रेंडिंग, आयपीओची माहिती देत विश्वास जिंकला. त्यांना एक ट्रेडिंग ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले.
त्यांना आभासी स्वरुपात पैशांचा परतावा ऑनलाइन दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी फोन-पे व इंटरनेटद्वारे रकम उकळून तीन महिन्यांत सुमारे ३७ लाख रूपयांची फसवणूक केली. जेव्हा आपली फसवणूक झाल्याचे मुर्डेश्वर यांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी शहर सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार कथन करून तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणूक व माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
उच्चशिक्षित ठरताहेत बळी! सायबर गुन्हेगारीचे बळी उच्चशिक्षित सुशिक्षित लोक ठरत आहेत. डॉक्टर, शिक्षक, इंजिनिअर, सेवानिवृत्त अधिकारी अशा पेशातील सुशिक्षित लोक सायबर गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकल्याचे आतापर्यंतच्या दाखल विविध गुन्ह्यांमधून समोर आले आहे. यामुळे सोशल मीडिया हाताळताना अनावश्यक ॲप्लिकेशन डाऊनलोड करणे टाळलेले बरे, असा सल्ला सायबर पोलिसांनी दिला आहे.
कोणत्या प्रकारचे किती गुन्हे दाखल? बोगस शेअर ट्रेडिंग- १७ऑनलाइन जॉब फ्रॉड- ०५लिंक पाठवून रिमोट ॲक्सेस- ०२बनावट कॉलिंग- ०६डेबिट-क्रेडिट कार्ड- ०१ऑनलाइन खरेदी- ०१