धुळे : तालुक्यातील आर्णी गावात एकाच रात्री अडीच ते तीनच्या सुमारास चार ठिकाणी घर फोडले. चोरट्यांनी रोख रक्कम, तांबे पितळाचे भांडे, घरातील मौल्यवान वस्तू आणि सोन्या चांदीचे दागिने असा हजारोंचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना शनिवारी पहाटे घडली. या चोरीच्या घटनेमुळे गावात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
धुळे तालुक्यातील आर्णी गावात काही परिवार बाहेरगावी गेल्यामुळे त्यांचे घर बंद होते. बंद घराचा कडी कोयंडा व कुलूप तोडून, तसेच काही घरांच्या मागची दारं तोडून चोरट्यांनी हातसफाई केली. याशिवाय काही ठिकाणी चोरीचा प्रयत्नदेखील झाला आहे. यात आर्णी गावातील अमृत नाना कोळी यांच्या घरातील शेतीसाठी ठेवलेले ८० ते ८५ हजार रुपये रोख, तसेच सोन्या- चांदीचे दागिने लंपास झाले आहेत. सिंधूबाई आनंदा कोळी यांच्या घरातून दहा ते पंधरा हजार रुपये रोख, सोन्या -चांदीचे दागिने आणि घरातील तांबे पितळाचे भांडे चोरून नेले आहे. किशोर त्रिभुवन यांच्या घरातून ७ ते ८ हजार रुपये रोख आणि घरातील इतर वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. वसंत भिल यांच्या घरातून चांदी आणि इतर वस्तू चोरट्याने लंपास केत्या आहेत.
यादरम्यान, चोरट्यांनी गावातील विनोद त्रिभुवन यांच्या घरातील दरवाजा तोडून घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु वेळेत त्यांना जागा आल्याने चोरट्यांनी पळ काढला. या घटनेमुळे चोरट्यांची मोठी टोळी सक्रिय असल्याच्या संशयाने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी गावातील तंटामुक्ती संघटनेचे अध्यक्ष संदीप त्रिभुवन यांनी पोलिस प्रशासनाला चोरीची माहिती दिली. पोलिसांनीही गावात येऊन पाहणी केली. श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञ यांनीही घटनास्थळी धाव घेतली होती.