ठाणे : विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्याच्या नावाखाली एका महिलेची परमिल कुमार या भामटयाने चार लाख २९ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी फसवणूकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी सोमवारी दिली.
घोडबंदर रोड येथील एका ५४ वर्षीय महिलेला तिच्या मोबाईलवर ४ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.१८ वाजण्याच्या सुमारास परमिल कुमार नामक अज्ञात भामटयाने आर्मी पब्लीक स्कुल, कुलाबा येथे विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यासाठी कॉल केला. त्यासाठी शुल्कही ठरविल्यानंतर दुसºया मोबाईलवरून व्हिडीओ कॉल करण्यास सांगितले. याचदरम्यान, त्या महिलेच्या अॅक्सीस बँकेतील खात्याच्या डेबिट कार्डची माहिती चलाखीने पाहून घेतली. त्यानंतर या भामटयाने बँक खाते लिंक करण्याचे कारण सांगून तक्रारदार महिलेला आधी दहा रुपये नंतर शंभर रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. ती पैसे ट्रान्सफर करीत असताना त्याने तिच्या बँक खात्याची माहिती घेतली.
त्यानंतर टप्याटप्याने तिच्या बँक खात्यातून चार लाख २९ हजार ७३७ रुपये काढून तिची आर्थिक फसवणुक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने कासारवडवली पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुध्द फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक योगेश आव्हाड हे करीत आहेत.