मुंबई : लेकीच्या लग्नासाठी मित्राकडून लाखो रुपये उसने घेत शेअरिंग ऑटोने प्रवास करणे एका ५३ वर्षीय व्यक्तीला महागात पडले. या प्रवासात त्यांचे ४ लाख रुपये चोरण्यात आले असून त्यांनी याविरोधात एमआयडीसी पोलिसांकडे धाव घेतल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंधेरी पूर्वच्या नागरदास रोडवर हा प्रकार घडला. तक्रारदार अनिल झा यांच्या मुलीचे डिसेंबर महिन्यात लग्न असल्याने त्यासाठी पैसे कमी पडत होते. तेव्हा त्यांना त्यांच्या मित्रांनी मिळून ४ लाख रुपये दिले. ते पैसे त्यांनी ६ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे अकराच्या दरम्यान कांदिवलीत जाऊन घेतले आणि सोबत आणलेल्या बॅगेत नीट ठेवले. कांदिवली वरून अंधेरी रेल्वे स्टेशनला आल्यावर त्यांनी पैसे तपासून पाहिले तेव्हा ते सुस्थितीत होते. मात्र पुढे अंधेरी पूर्वला जाण्यासाठी त्यांनी शेअरिंग रिक्षा पकडली. त्या रिक्षामध्ये चालकाच्या बाजूला एक तर झा यांच्या शेजारी दोघेजण असे चार प्रवासी होते.
बॅग मागे ठेवायला सांगितली आणि....काही अंतरावर गेल्यानंतर आगे आरटीओ वाला है, फाईन मारेगा, आगे जो है उसे पीछे बिठाओ असे रिक्षाचालक म्हणाला. त्यावर रिक्षा चालकाच्या बाजूला बसलेला इसम मागील सीटवर असलेल्या झा यांच्या अंगावर प्रेशर देऊन बसला. त्यांनी त्याला नीट बसायला सांगितल्यावर तुमच्या हातात असलेल्या बॅगमुळे मला नीट बसता येत नाही, ती बॅग मागे ठेवा, असे त्याने झा यांना सांगितले.
...आणि ते बेशुद्ध झा यांनी बॅग मागे ठेवली आणि तासाभरानंतर इच्छितस्थळी पोहोचले. काही वेळाने बॅग तपासली, तेव्हा चार लाख रुपये त्यांना सापडले नाहीत आणि ते बेशुद्ध पडले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना मालाडच्या मित्राच्या ऑफिसमध्ये सोडले. त्यानंतर झा यांनी तिथून पोलिस ठाणे गाठले.