गुमला (झारखंड) : जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून चार वृद्धांची जमावाने हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडला. झारखंडमधील गुमला जिल्ह्यात झालेल्या या भयंकर प्रकारात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
शनिवारी रात्री उशिरा नगर सिसकारी गावात अशी घटना घडल्याचे कळाल्यानंतर पोलीस तातडीने गावात दाखल झाले. पोलीस अधीक्षक अंजनीकुमार झा यांनी सांगितले की, चेहरे झाकलेल्या दहा ते बारा जणांनी या चार जणांना घराबाहेर काढले व गावाबाहेर नेऊन त्यांचा प्राण जाईपर्यंत काठी, लोखंडी सळईने बेदम मारहाण केली. जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून हा प्रकार घडल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसते.
सुना ओरोन (६५), चंपा ओरोन (७९), फगनी ओरेन (६०) व पिरो ओरेन (७४) अशी ठार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मारेकऱ्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम उघडली आहे. हत्येमुळे गावात तणाव पसरला असून, गावकरी भीतीच्या छायेत आहेत. या घटनेबाबत कोणीही बोलण्याच्या स्थितीत नाहीत.
झारखंडमध्ये घटनेपूर्वी गावात भरली पंचायत नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर एका गावकºयाने सांगितले की, हत्येची घटना घडण्यापूर्वी गावात पंचायत भरवण्यात आली होती. त्यात चार जणांवर काळी जादू करीत असल्याचे आरोप लावण्यात आले होते. हे चौघेही काळी जादू करण्याच्या कृत्यात सामील आहेत, असेही सर्व जण म्हणाले होते.