नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या IFSO युनिटने भारतीयांची वैयक्तिक माहिती डार्क वेबवर विकल्याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) डेटा बँकेतून डेटा लीक करण्यात आला. त्यानंतर डार्क वेबवर विक्रीसाठी अपलोड करण्यात आला होता. या सर्व आरोपींना १० दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती, मात्र याबाबात आता खुलासा झाला आहे.
सर्व आरोपींना तीन वेगवेगळ्या राज्यांतून अटक करण्यात आली आहे. ज्यामध्ये हरयाणा, ओडिशातून प्रत्येकी एक आणि झाशीतून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी एका गेमिंग प्लॅटफॉर्मवर भेटले आणि त्यांनी झटपट पैसे कमवण्यासाठी डेटा हॅक करून डार्क वेबवर विक्रीसाठी ठेवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, डार्क वेब ही अशी जागा आहे, जिथे इंटरनेट युजर्साचा डेटा वेगवेगळ्या किमतीत विकला जातो.
काय असते डार्क वेब?डार्क वेब किंवा इंटरनेटच्या काळ्या जगाबद्दल तुम्ही कुठेतरी ऐकले किंवा वाचले असेल. डार्क वेब हे इंटरनेटचे ते जग आहे, ज्यात तुम्ही तुमच्या ब्राउझरद्वारे प्रवेश करू शकत नाही. दरम्यान, आपण सर्व इंटरनेटच्या जगात प्रवेश करण्यासाठी जे ब्राउझर वापरतो ते फक्त ४ टक्के आहे. उरलेले ९६ टक्के डार्क वेब किंवा इंटरनेटचे काळे जग आहे.
डार्क वेबवर पोहोचणे सोपे नाही आणि जरी तुम्ही येथे पोहोचलात तरी हॅकर्सपासून दूर राहणे तुमच्यासाठी अवघड आहे. इंटरनेटच्या या काळ्या जगात लोकांचा डेटा खुलेआम विकला जातो. डार्क वेबमध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळते, जी सामान्य सर्च इंजिनवर इंडेक्स केलेली नसते. वेबसाईटची माहिती, लोकांचा वैयक्तिक डेटा, बँकांची माहिती इत्यादी अनेक महत्त्वाच्या गोष्टी, या वेबवर खरेदी-विक्री केल्या जातात.