बारामती - ऐन गणपती विसर्जनादिवशी बारामती शहरात एका तरुणाकडे ४ गावठी पिस्तूल, १४ जिवंत काडतुसे आढळली आहेत. बारामती गुन्हे शोध पथकाने पेट्रोलिंगदरम्यान सापळा रचून केलेल्या कारवाईदरम्यान घेतलेल्या अंगझडतीमध्ये तरुणाकडे पिस्तूल आणि जिवंत काडतुस आढळले आहे. बारामती गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली.बारामती गुन्हे शोध पथकाचे प्रमुख चंद्रशेखर यादव यांनी याबाबत माहिती दिली. गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे बारामती शहरात पेट्रोलिंग सुरू होते. यावेळी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अपर पोलीस अधीक्षक बारामती यांच्या पथकाने सराईत आरोपी दत्ता अशोक शिंदे (वय २३, रा. राहू, तालुका दौंड, जि. पुणे) याच्याकडून ४ गावठी पिस्तूल, १४ जिवंत काडतुसे, दुचाकी वाहन, एक मोबाईल हँडसेट असा एकूण २,७०,३५० रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन आरोपी आणि मुद्देमाल बारामती शहर पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. अटक केलेल्या आरोपीवर भोसरी पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचे ८ गुन्हे दाखल आहेत.पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक बारामती गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, रमेश केकान, रॉकी देवकाते, पोलीस कॉन्स्टेबल दशरथ कोळेकर, शर्मा, पवार, विशाल जावळे यांनी केली आहे.
४ गावठी पिस्तूल, १४ जिवंत काडतुसे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 1:15 AM