संदीप वानखडे / बुलढाणा बुलढाणा : जालना जिल्ह्यातील राजूर येथील २७ वर्षीय युवकास बुलढाण्यातील फ्लॅट विक्रीचे आमिष दाखवून तब्बल ४० लाख रुपयांनी फसवणूक केल्याची घटना ९ सप्टेंबर राेजी उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे बुलढाणा शहर पाेलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या तीन पाेलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने खंडणीही मागितल्याचे समाेर आले आहे. याप्रकरणी पाेलिसांनी तीन पाेलिसांसह सहा जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
राजूर येथील मयूर रामेश्वर हाजबे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुलढाणा शहरातील एक फ्लॅट दाखवून खरेदी करून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यासाठी सुरुवातीला चार लाख रुपयांचा इसार करण्यात आला. त्यानंतर हाजबे यांच्याकडून आराेपींनी ४० लाख रुपये वसूल केले. फ्लॅटची खरेदी करून न देता अवैध बंदूक वापरल्याप्रकरणी कारागृहात टाकण्याची धमकी दिली. तसेच बुलढाणा शहर पाेलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले प्रकाश दराडे, माेरे आणि नागरे यांच्या मदतीने व शुभम जीवन पांधे याच्या मध्यस्थीने खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी बुलढाणा शहर पाेलिसांनी याप्रकरणी बुलढाणा शहर पाेलिसांत कार्यरत असलेल्या प्रकाश दराडे, माेरे व नागरे यांच्यासह अजय रामसिंंग परदेशी, शुभम जीवन पांधे यांच्यासह माहिते यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरण पुढील तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडे साेपविण्यात आले आहे.