नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक घटना आता समोर आली आहे. गीता कॉलनीमध्ये शनिवारी दुपारी एका व्यक्तीने आपली पत्नी आणि मुलाची गळा दाबून हत्या केली. मृतांमध्ये कंचन अरोडा (38) आणि मुलगा ध्रुव (15) यांचा समावेश आहे. पोलिसांनी सायंकाळी उशिरा आरोपी पती सचिन (40) याला अटक केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्यानंतर तो वडिलांसोबत किराणाच्या दुकानात बसत होता. पैशांवरुन पत्नीसोबत वारंवार भांडण होत होतं. यातून त्याने हे धक्कादायक पाऊल उचललं आहे.
सचिन अरोडा शनिवारी दुपारी साधारण 2 वाजता दुकानातून घरी आला. तो दुसऱ्या माळ्यावर गेला. साधारण 20 मिनिटांनंतर तो खाली आला. आणि म्हणाला की, मी त्यांचं काम पूर्ण केलं आहे आणि आता स्वत:चं काम करायला जातोय. वडील ओम प्रकाश हे ऐकून अवाक् झाले. आणि सचिनचा हात पकडण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र हात सोडून तो दूर पळाला. वडील दुसऱ्या मजल्यावर गेले तर सून कंचन आणि नातू ध्रुव मृत अवस्थेत होता. हे दृश्य पाहून वडिलांना धक्काच बसला.
सचिनने फॅमिलीच्या व्हॉट्सएप ग्रुपवर एक मेसेज 3 वाजून 18 मिनिटांनी पाठवला. माझ्या कुटुंबातील सर्वांनी खूश राहावं आणि एन्जॉय करावं. गुड बाय... सर्वांसाठी माझे शेवटचे शब्द... दुसरा मेसेज 3 वाजून 48 मिनिटांनी पाठवला. हे सर्व मी माझ्या मर्जीने केलं आहे. माझं डोकं खराब झालं आहे. सर्वांना माझा नमस्कार.... यामुळे कुटुंबातील सर्वजण घाबरले आणि त्यांनी फोन करायला सुरुवात केली. यानंतर त्यांना कळालं की, सचिनने पत्नी आणि मुलाची हत्या केली आहे.
तब्बल तीन तास शोध घेतल्यानंतर टेक्निकल सर्विलान्सच्या माध्यमातून सचिनला पोलिसांनी आयटीओ ब्रिजच्या दिशेने पायी जाताना पाहिलं आणि त्याला पकडण्यात आलं. सुरुवातीच्या चौकशीत त्याने सांगितलं की, लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली होती. यानंतर तो गीता कॉलनीत किराण्याचं दुकान चालवित होता. मात्र आर्थिक स्थिती सुधारलीच नाही. यामुळे घरात पत्नीसोबत वाद होत होता. यामुळे संतापून त्याने पत्नी आणि मुलाची हत्या केली. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.