जालना : तिरूअनंतपूरम येथून जालनामार्गे ट्रकमध्ये नेण्यात येणारा तब्बल ४०० किलो गांजा मंठा पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जिंतूर- मंठा मार्गावरील हेलस पाटीजवळ करण्यात आली. पोलिसांनी तब्बल ४०० किलो गांजा जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
केरळ राज्यातून गांजा घेऊन येणारा एक ट्रक जालना- मंठा रोडवरून जात असल्याची माहिती मंठा पोलीस ठाण्याचे पोनि विलास निकम यांना मिळाली होती. या माहितीवरून पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि निकम व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी पहाटे हेलस पाटीजवळ सापळा रचून एक ट्रक (क्र.एम.एच.२०- डी.ई.६७७७) ताब्यात घेतला. पोलिसांनी ट्रकमध्ये तपासणी केली असता जवळपास ४०० किलोच्यावर गांजा आढळून आला आहे. गांजासह ट्रक व चालक संजय सिंघल (रा. वैजापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवारी सकाळी सुरू होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील एका घरावर कारवाई करून तब्बल ७१ किलो गांजा जप्त केला होता. त्यानंतर मंठा पोलिसांनी चक्क ४०० किलो गांजाची वाहतूक करणारा ट्रक पकडल्याने गांजा तस्करांचे धाबे दणाणले आहेत.