मडगाव: दक्षिण गोव्यात विशेषतः केपे, कुडचडे परिसरात ड्रग्स सेवनाचे प्रमाण वाढले असताना क्रायम ब्रँचने गुरुवारी रात्री केलेल्या कारवाईत त्या भागातील कुख्यात गुन्हेगार व्हेली डिकॉस्ता याला अटक केली. त्याच्या तिळामळ येथील घराची झडती घेतली असता 40 हजार रुपयांचा गांजा सापडला.
या आरोपीला काही वर्षांपूर्वी अमली पदार्थ विभागाने कुठ्ठाळी येथे ड्रग्स वितरण करण्यासाठी आलेला असताना अटक करून त्याच्याकडून लाखो रुपयांचा माल पकडला होता. व्हेलीने आपले हे धंदे पुन्हा सुरू केल्याचे पोलिसांना कळून चुकल्यावर ते त्याच्या हालचालीवर नजर ठेऊन होते. गुरुवारी तो आपल्या तिळामळ येथील घरी असल्याची माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक फिलॉमेन कॉस्ता आणि उपनिरीक्षक मेर्लन डिसोझा यांनी ही धडक कारवाई करीत त्याला अटक केली. या प्रकरणात निरीक्षक मंगेश वळवईकर यांनी तक्रार नोंदविली होती.
व्हेली डिकॉस्ता हा कुख्यात गुन्हेगार असून यापूर्वी त्याला घरफोडी प्रकरणातही अटक करण्यात आली होती. सध्या तो ड्रग्सच्या धंद्यात कार्यरत होता. लॉकडाऊन नंतर दक्षिण गोव्यात ड्रग्स व्यवसायाने पुन्हा एकदा आपले डोके वर काढले होते. या भागात विशेषतः तरुण वर्गात ड्रग्स सेवनाचे प्रमाण जास्त आहे.