जळगाव : खातेदारांची इत्यंभूत बँक खात्यांची मिळवून सुमारे ४१२ कोटी रूपयांवर ऑनलाइन डल्ला मारण्यापूर्वी टोळीचा जळगावातील रामानंदनगर पोलिसांनी गुरूवारी रात्री पदार्फाश केला़. या प्रकरणी पोलिसांनी जळगावातील पत्रकारासह धुळ्यातील एका बांधकाम ठेकेदाराला अटक केली आहे़. हेमंत ईश्वरलाल पाटील (४२, रा़. भुरे मामलेदार प्लॉट, जळगाव) व मोहसिन खान ईस्माईल खान (३५, रा़ देवपूर, जि.धुळे) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत़.
बँकतील खातेधाराकांशिवाय कुणालाही न मिळणारी देशभरातील २९ बँक खात्यांची माहिती पत्रकार हेमंत पाटील व धुळे येथील बांधकाम ठेकेदार मोहसिन खान यांच्यासह ९ जणांनी गैरमार्गाने मिळविली होती़. माहिती तर मिळाली, मात्र खात्यांमधील रक्कम ही आपल्या खात्यात कशी वळती करायची? हा प्रश्न उभा राहिला. त्यामुळे हेमंत पाटील हा गेल्या दोन महिन्यांपासून हॅकर भंगाळे याला टक्केवारीचे आमिष दाखवून हॅकींग करून खात्यांमधील पैसे ट्रान्सफर करण्यासाठी गळ घालित होता. या प्रकाराला कंटाळून अखेर मनिष भंगाळे याने रामानंदनगर पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक अनिल बडगुजर यांना संपर्क साधून सगळी हकीकत सांगितली. नंतर पोलीस अधीक्षकांना भेटून लुटीचा डाव उधळण्याचा प्लॅन रचला. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, मनिषने एकाचे बँक खाते हॅक केले. नंतर त्या खात्यातून हेमंत पाटील व मोहसिन खान तसेच त्यांच्या एका साथीदाराच्या खात्यात सुमारे हजार रुपए ट्रान्सफर करून विश्वास संपादन केला. तुमच्या कामाला सुरूवात झाली आहे, उद्या भेटा माहिती द्या, असे सांगून भेटण्यास सांगितले़. त्यानुसार हेमंत पाटील व मोहसिन खान हे दोघं जळगावातील एकलव्य मैदानाजवळ असलेल्या अथर्व दूध डेअरीजवळ भेटण्यासाठी गुरूवारी रात्री आले़. त्याच ठिकाणी पोलिसांनी त्यांना सापळा रचून अटक केली़.टोळीतील इतर सात जणांच्या शोधार्थ तीन पथक रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे, हा लुटीचा डाव माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपांमुळे चर्चेत आलेला हॅकर मनिष भंगाळे यांच्या मदतीने उधळून लावला आहे.