मीरारोड - शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्या , कंटेनर , ग्लास , चमचे आदींचा साठा असलेल्या भाईंदर पूर्वेच्या एका दुकानावर महापालिका उपायुक्त अजित मुठे यांनी धाड टाकून तब्बल ४५० किलो इतका प्लास्टिक साठा जप्त केला. या प्रकरणी सदर दुकानासह अन्य काही दुकान - गोदामांना सील ठोकण्यात आले आहे.
मीरा भाईंदरमध्ये बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा उघडपणे सर्वत्र वापर व विक्री होत असताना पालिकेच्या आरोग्य विभागाकडून तक्रारी होऊन व बातम्या प्रसिद्ध होऊन सुद्धा कारवाईस टाळाटाळ केली जात होती. पालिकेच्या आरोग्य विभागाचा वरदहस्त असल्याने शहरातील प्लास्टिक विक्रेते माफिया मोकाट झाले होते. शासनाच्या बंदी आदेशाचा आणि पंतप्रधानांनी केलेल्या प्लास्टिक बंदीच्या आवाहनाचा पुरता फज्जा उडाला होता. नगरसेवक आणि राजकारणी सुद्धा ह्या प्रकरणी चिडीचूप असतात.
कोरोनाचा विषाणू जास्तकाळ प्लास्टिक वर असतो असे निष्कर्ष येऊन देखील शहरात मात्र सर्वत्र प्लास्टिक पिशव्यांचा सुळसुळाट चालला आहे . त्यातच उपायुक्त अजित मुठे यांना प्रभाग ३ मधील भाईंदर पूर्व रेल्वे स्थानक समोरील परिसरात बंदी असलेल्या प्लास्टिकचा साठा आणि विक्री सुरु असल्याची माहिती मिळाली.
आयुक्त दिलीप ढोले यांच्या निर्देश वरून बुधवारी भाईंदर स्टेशन समोरील प्लास्टिक मार्केट अशो ओळख असलेल्या शांतीगंगा इमारतीतील प्रेम सागर पॅकेजिंग या प्लास्टिक दुकानाची अचानक तपासणी केली असता तेथे मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक साठा आढळून आला.
मुठे यांनी प्रभाग अधिकारी दामोदर संख्ये, आरोग्य विभागाचे अधिकारी राजकुमार कांबळे, स्वच्छता निरीक्षक रमेश घरत आदींना पाचारण करून सदर साठा जप्त करण्यास सांगितले.त्यानुसार प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला. या शिवाय समोरच्या आशिष पॅकेजिंग चे दुकान व मागील भागातील गोदाम सुद्धा पालिकेने सील केले आहे .
पाहणी करते वेळी मुठे यांनी प्लास्टिक पिशव्या खरेदी करायच्या बहाण्याने सदर दुकानात शिरकाव केला . दुकानदाराने बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या दाखवल्या . कारवाई मध्ये एकाच दुकानातून जवळजवळ साडेचारशे किलो प्लास्टिक पिशव्या, कंटेनर, ग्लास, चमचे इत्यादी साठा आढळून आला. सदर विक्रेत्याचे दुकान सिल करण्यात आले.
कारवाई दरम्यान दुकानदार मुकेश आणि राजेश यांनी गोंधळ करुन कारवाईत अडथळा आणला . इतकेच नव्हे तर कुटुंबियांना पुढे करून मुख्य रस्त्यावरील वाहतूक सुद्धा अडवून ठेवली . यावेळी नवघर पोलिसांना सुद्धा मुठे यांनी पाचारण केले होते . मुठे यांनी संबंधित दुकानदारा विरुध्द गुन्हा दाखल करण्याच्या सुचना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असून नवघर पोलिसांनी रात्री पर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता .