आशिष गावंडे, अकोला: रेशनचा गहू असलेले ४८ ट्रक धान्य सरकारी धान्य गोदामात व नियाेजित ठिकाणी न पाेहाेचवता आरोपींनी संगनमताने गायब केले होते. या याप्रकरणी तब्बल २४ वर्षांनंतर निकाल देताना मुख्य न्यायदंडाधिकारी शितल बांगड यांनी गुरुवार २९ फेब्रुवारी रोजी तत्कालिन निवासी उपजिल्हाधिकारी व पुरवठा अधिकाऱ्यासह सात जणांना शिक्षा ठोठावली. रेशनचा गहू असलेले तब्बल ४८ ट्रक धान्य अधिकाऱ्यांनी संगमनताने गायब केल्याची धक्कादायक घटना सन १९९९ मध्ये घडली हाेती.
याप्रकरणी अकोटफैल पोलिस ठाण्यात सहायक पुरवठा अधिकारी श्रावण बोर्डे यांनी सन २००० मध्ये फिर्याद दिली होती. त्यात अकोला व वाशीम जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना रेशनकार्डवर वितरित करण्यात येणारा ४५ लाख ७३ हजार २२६ रुपये किमतीचा ४८ ट्रक गहू गायब झाल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच या प्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. ट्रान्सपोर्ट कॉन्ट्रॅक्टर म्हणून रामदयाल बद्रीप्रसाद गुप्ता यांची नाेंद हाेती. ४८ ट्रकमधील गहू मालेगाव, मंगरुळपीर, रिसोड, वाशीम येथे पोहोचलाच नव्हता.
पोलिस तपासामध्ये रामदयाल गुप्ता, त्याच्या ट्रकचा चालक, मॅनेजर, तसेच तत्कालिन निवासी उपजिल्हाधिकारी जगदीश मुन्नासिंग चव्हाण, पुरवठा अधिकारी संतोष चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. सदर खटल्याचा निकाल देताना मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी सात जणांना शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकिल दीपक काटे व विद्या सोनटक्के यांनी कामकाज पाहिले.
२४ वर्षांनी निकाल; ४१ साक्षीदारांची साक्ष
याप्रकरणी सरकार पक्षाने ४१ साक्षीदार तपासले असता, आराेपींनी संगणमताने गुन्हा केल्याचे आढळून आले. यामुळे न्यायालयाने आरोपी कॉन्ट्रॅक्टर रामदयाल गुप्ता याला भादंविच्या कलम ४०७ अन्वये पाच वर्षे शिक्षा, ४० हजार रुपये दंड, कलम ४२० मध्ये पाच वर्षे शिक्षा १५ हजार रुपये दंड, ४६८ अन्वये तीन वर्षे शिक्षा व १० हजार रुपये दंड, २०१ अन्वये दोन वर्षे शिक्षा व दोन हजार रुपये दंड, तसेच सातही सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गुन्हा करण्यासाठी आरोपींना प्रवृत्त केले म्हणून त्यांना कलम ४०७, ४२०, ४६८ अन्वये दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. ट्रक चालकाची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका करण्यात आली.